कोरोना योद्धे स्वस्त धान्य दुकानदारांचा १ मे पासून संपाचा इशारा; विमा कवच देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:07 PM2021-04-29T19:07:00+5:302021-04-29T19:07:21+5:30
कोरोना काळात भुकबळी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्य वाटप केले.
खुलताबाद : राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना महामारीत शासनाकडून विमाकवच अथवा कोरोना मुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार १ मे पासून धान्याचे वाटप बंद करणार असल्याची माहिती खुलताबाद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष छबू कांबळे, सचिव साईनाथ लोखंडे यांनी दिली. याबाबतचे निवेदन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिले आहे.
कोरोना काळात भुकबळी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्य वाटप केले. या काळात अनेक दुकानदार कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले तरीही दुकानदारांनी आपले वितरण सुरूच ठेवले. मात्र, शासन विमाकवच अथवा कोणतीही आर्थिक मदत करत नसल्याने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडून सकारात्मक निर्णय येत नाही तोपर्यंत धान्याचे मागणी पत्र मंजूर करू नये व १ मे पासून दुकानातून धान्य वाटप करू नये असा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पुरवठा विभाग यांना दिली असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.