उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता तीन तास बसून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:47+5:302021-01-03T04:06:47+5:30
फुलंब्री : ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेला कोरोना संक्रमित रुग्ण तीन तास बसून होता. रुग्णालयात डॉक्टरांकडे पीपीई कीट नसल्याने तसेच ...
फुलंब्री : ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेला कोरोना संक्रमित रुग्ण तीन तास बसून होता. रुग्णालयात डॉक्टरांकडे पीपीई कीट नसल्याने तसेच रुग्णास घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने संबंधित रुग्णास काही वेळ बसून राहावे लागले. शेवटी एका खासगी वाहनाने त्यास औरंगाबादला पाठविण्यात आले.
फुलंब्रीतील एक व्यक्तीने शनिवारी औरंगाबाद शहरात एका खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन केले होते. यात संबंधित रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आला. खासगी रुग्णालयातने त्यास घाटीत पाठविणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. ही व्यक्ती फुलंब्रीमध्ये परत आल्यानंतर सायंकाळी पाचला ग्रामीण रुग्णालयात पोहोचली; पण त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास औरंगाबादच्या घाटीत पाठविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. तसेच त्याची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात पीपीई कीटसुद्धा उपलब्ध नसल्याने तो रुग्ण ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात बसून होता. कोरोना काळात रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली आहे. फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी रुग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार मिळत नसल्याची स्थिती आहे.
--- कुणीच आले नाही -----
मी फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी पाचपासून आलो आहे. मात्र, आठ वाजले तरी माझ्यावर कुठलेच उपचार करण्यात आले नाहीत. रुग्णालयात सुविधा नसल्याचे सांगण्यात येत होते. उपचार मिळेल या हेतूने मी बसल्यावर शेवटी एका खासगी वाहनातून मला औरंगाबादला पाठविण्यात आले.
- कॅप्शन : फुलंब्री ग्रामीण रुग्णालयातील बाकड्यावर बसून असलेला कोरोना संक्रमित रुग्ण.