ग्रामपंचायत निवडणुकीचा कोरोनामुळे खर्च वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:33 PM2020-12-16T12:33:34+5:302020-12-16T12:37:02+5:30
१८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेचे शेड्युल्ड ठरविण्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ होणार आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दावा केला की, या निवडणुकीत देखील पदवीधर निवडणुकीप्रमाणे काळजी घेतली जाणार आहे. निवडणुकीचे व्यवस्थापन तहसील पातळीवर असते, त्यामुळे निवडणुकांचा तालुकानिहाय प्रोटोकॉल ते पाहतील. जिल्हाधिकारी म्हणून सर्व सूचना आणि मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या तसेच डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ६११, अशा एकूण ६१८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेचे शेड्युल्ड ठरविण्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ होणार आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक कामात अडकलेली असेल, सोबतच लसीकरण मोहीम देखील राहणार आहे.
प्रशिक्षण देणार
१५ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना निघाली आहे. शासकीय कला महाविद्यालय येथून मतदान यंत्र तहसील पातळीवर कंटनेरमधून पोहोचविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या गरजनेनुसार ईव्हीएम देण्यात येणार आहेत. अधिसूचनेनंतर मतदान केंद्र, सुरक्षित अंतरासाठी मार्किंग, सॅनिटायझर आदी बाबींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.