कोरोनात उपचाराची खिचडी; गरज नसताना दिले इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:02 AM2021-02-06T04:02:01+5:302021-02-06T04:02:01+5:30
औरंगाबाद : कोविडकाळात रुग्णाला काही झाले की दे रेमडेसिव्हिर, दे टोसिलिझुमॅब इंजेक्शन. मग किडनीचा त्रास सुरू झाला की किडनीचे ...
औरंगाबाद : कोविडकाळात रुग्णाला काही झाले की दे रेमडेसिव्हिर, दे टोसिलिझुमॅब इंजेक्शन. मग किडनीचा त्रास सुरू झाला की किडनीचे औषध दे, लिव्हरचा त्रास सुरू झाला की लिव्हरचे औषध दे, असं करून पूर्ण खिचडी करून टाकली. काही डाॅक्टर असे पाहिले की, ज्यांना टोसिलिझुमॅब द्यायची केस (रुग्ण) नाही, हे आम्ही सांगितले. तरीही इंजेक्शन दिले. त्याचा रुग्णांवर गंभीर परिणाम झाल्याचे धक्कादायक विधान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी येथे केले.
शासकीय दंत महाविद्यालयात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान, मौखिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयाेजित उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून केंद्रेकर बोलत होते. यावेळी धनश्री केंद्रेकर, अधिष्ठाता डाॅ. माया इंदूरकर, उपअधिष्ठाता डाॅ. प्रज्ञा बनसोडे, डाॅ. विलास राजगुरु यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सुनील केंद्रेकर यांनी या कार्यक्रमाला आपण अपघाताने मुख्य अतिथी झालो. कारण मी रुग्णालात रुग्ण म्हणून आलो होतो, असे म्हणाले.
‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाला नसल्याने दंतच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागल्याने विद्यार्थ्यांमध्यै नैराश्य येते. हे नैराश्य दूर होण्याच्या दृष्टीने सुनील केंद्रेकर यांनी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करतानाच कोरोळाकाळात डाॅक्टरांसंदर्भात आलेला अनुभव सांगत रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. सीआरपी वाढलेला नसताना टोसिलिझुमॅब इंजेक्शन दिले. त्यांचा रुग्णांवर परिणाम झाला. काय फायदा झाला. एमबीबीएस करताना चित्रपट पाहणार, व्यसने करणार, ४०-४५ टक्के मार्क घेऊन डाॅक्टर होणार. डिग्री आहे; पण डोके नाही, अशी अवस्था असल्याचे केंद्रेकर म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी डाॅ. शिरीष खेडगीकर, डॉ. राजन महिंद्रा, डाॅ. जयश्री जाधव, डाॅ. हर्षल बाफना, डाॅ. वैशाली नांदखेडकर, डाॅ. सोनाली महाजन, डाॅ. सविता ढगे आदींची उपस्थिती होती.
युद्धाची वेळ आल्यावर आठवली कोमोरबिडिटी
कोरोनात अनेक डाॅक्टरांनी कोमोरबिडिटी, वय अधिक असल्याचे सांगून कामाला नकार दिला. युद्धाची वेळ आल्यावर त्यांना हे आठवले. व्यसने करताना हे आठवत नाही का, असा सवालही केंद्रेकर यांनी केला. साधा मास्क लावून स्वत: मी आयसीयूत फिरलो, असेही ते म्हणाले.
फोटो ओळ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आयोजित कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर.