श्रावणावर कोरोनाचे ढग : वेरूळकरांची अर्थव्यवस्था ढासळली; अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:23 PM2020-07-27T19:23:34+5:302020-07-27T19:26:32+5:30
सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प
- सुनील घोडके
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने मंदिर प्रशासनासह अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातही सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणाऱ्या श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
श्रावण महिन्यात दर सोमवारी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. त्यामुळे महिनाभर येथील व्यावसायिक कामधंद्यात मग्न असतात. घृष्णेश्वर मंदिर परिसरात बेलफूल, तसेच इतर छोटे-मोठे हॉटेल, दुकाने, फोटोग्राफर, हॉकर्स असे २५० जण व्यवसाय करतात. या सर्वांचा श्रावण महिन्यात जवळपास ४० ते ५० लाख रुपयांचा व्यवसाय होतो.
उत्पन्नाचा स्रोतच नाही
श्रावण महिन्यात मंदिर बंद असल्याने व्यावसायिक, तसेच मंदिरातील पुजारी घरीच बसून आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा स्रोत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत आहेत.
सर्वच विक्रेते हवालदिल
श्रावण महिन्यात तरी श्री घृष्णेश्वर मंदिर उघडेल या आशेवर व्यावसायिक होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने घृष्णेश्वर मंदिर श्रावण महिन्यात बंदच राहणार असल्याचे सांगितल्यानंतर मंदिर परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक, हॉकर्स, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज मालक, बेलफूल विक्रेते, धार्मिक साहित्य विक्रेते हवालदिल झाले आहेत.