कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खालावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 03:04 PM2020-10-05T15:04:12+5:302020-10-05T15:04:39+5:30
मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादकरांची वाटचाल आता हर्ड इम्युनिटीकडे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील सात दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. प्रत्येकाने फक्त मास्कचा वापर केला तरी १०० टक्के कोरोना आटोक्यात येऊ शकतो, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा ग्राफ झपाट्याने खाली येताना दिसत आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी शहरात २४५ कोरोनाबाधित सापडले होते. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी रूग्णसंख्या १७८ पर्यंत खाली आली होती. दररोजन मनपाकडून किमान १ हजार संशयित रूग्णांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये किमान १०० रूग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. शहरातील १७ लाख नागरिकांची वाटचाल हर्ड इम्युनिटीकडे सुरू झाली आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवार दि. ४ रोजी औरंगाबाद जिल्ह्यात १९३ रूग्ण आढळून आले तर ४०४ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच जिल्ह्यातील ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.