मराठवाड्यात कोरोनाचा कहर; १५ दिवसांत पाचपटीने वाढले रुग्ण; ५३६ कन्टेंनमेंट झोन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:39 AM2021-03-17T07:39:01+5:302021-03-17T07:40:48+5:30
१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा कहर वाढत असून, १५ दिवसांत पाचपट रुग्ण वाढले आहेत. १ मार्चला विभागातील ८ जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण कोरोनाग्रस्त होते. १६ मार्चला सकाळी ९ वाजेपर्यंत हा आकडा २६०० पर्यंत गेला आहे. शहरी भागात १४४२ तर ग्रामीणमध्ये ११५८ रुग्णांची नोंद झाली आहे. यावर उपाय म्हणून होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. ४०० वरून ५३६ कन्टेंनमेंट झोन सध्या विभागात आहेत.
१ मार्चला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६२ टक्के होते. १६ मार्चला ते प्रमाण ८९.८१ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यातून दिसते आहे. मृत्यूदर कमी असणे ही एक जमेची बाजू सध्या आहे. १५ दिवसांपूर्वी ६ हजार ३३३ नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते, तर १४ हजार ३२ नागरिक होम क्वारंटाइन करण्यात आले होते. आज रोजी विभागात ३२ हजार ३९३ नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर १२ हजार ११५ नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत.
रुग्णवाढीत औरंगाबाद आघाडीवर
रुग्णवाढ होण्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. शहरात तीन दिवसांपासून ८०० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत, तर ग्रामीण भागात २०० च्या पुढे आकडा चालला आहे. औरंगाबाद खालोखाल जालना, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांचा क्रमांक आहे. हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये रुग्णसंख्या कमी आहे.
उपाययोजनांसाठी निधीची मागणी
विभागात कोरोनाशी लढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३३ टक्के निधीची मान्यता मिळाली होती; परंतु हा सर्व निधी पायाभूत सुविधांवर खर्च झाला आहे. विभागातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयेही डीपीडीसीच्या निधीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे विभागीय प्रशासनाने निधीची मागणी शासनाकडे केली आहे.