corona virus : औरंगाबादमधील ‘ऑटो’ उद्योगाला ‘कोरोना’ची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:47 AM2020-03-05T11:47:39+5:302020-03-05T11:59:23+5:30
येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल.
- विकास राऊत
औरंगाबाद : चीनमध्ये उद्भवलेल्या ‘कोरोना’च्या साथीचा फटका औरंगाबादेतील स्वयंचलित वाहन (ऑटो) उद्योगांना बसला आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादनात २० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. स्वयंचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारे औरंगाबाद देशामधील प्रमुख केंद्र आहे.
चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर येथील उद्योग आणि उत्पादन अवलंबून असल्याने चीनमध्ये कोरोना साथीमुळे उद्योगांची झालेली पडझड कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारी ठरली. चीनमधून जहाज वाहतुकीद्वारे होणारा पुरवठा खंडित झाला असून, अशा पुरवठ्यांवर निर्बंध आल्यामुळे औरंगाबादेतील उत्पादनात घट झाली. परिणामी, उत्पादनाचे लक्ष्य गाठणे कठीण होण्याची शक्यता आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वस्टेशन, पैठण या प्रमुख औद्योगिक वसाहती औरंगाबादमध्ये आहेत.
सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले, चीनमधील कच्चामाल पुरवठा करणारी साखळी सध्या ठप्प पडलेली आहे. बी-६ वाहनांचे उत्पादन आता उंबरठ्यावर आहे. व्हेंडरमध्ये एमएसएमई सेक्टरमधील जे उद्योग आहेत, ते ज्यांचे पुरवठादार आहेत, त्या बड्या उद्योगांकडील स्टॉक सध्या असेल, तर काही जास्त परिणाम नाही होणार; परंतु बड्या उद्योगांकडील स्टॉक संपत आला, तर त्यांचे उत्पादन कमी होईल. त्याचा फटका एमएसएमईला बसू शकेल. येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, उद्योग वर्तुळात सध्या चिंतेचे वातावरण आहे. सप्लाय चेनवर परिणाम होत आहे. कृषी उद्योगांना लागणारे रसायन चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. सप्लाय चेन बंद असल्याने त्या उद्योगांनादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.
घाबरू नका, खबरदारी घेण्याचे आवाहन https://t.co/2iSWdeFqNl
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) March 4, 2020
१० ते २० टक्के उद्योगांवर परिणाम
कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, १० ते २० टक्के उद्योग विश्वांवर परिणाम होईल. आॅटोमोबाईल आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, अॅल्युमिनअम कच्चा मॉल, आॅटोमोटिव्हसाठी लागणारे पार्टस् ज्यामध्ये लघु व मध्यम दर्जातील पार्टस् ज्यांचा जास्त उत्पादनासाठी वापर होतो. या उत्पादनांची चीनमध्ये मोठी उत्पादन साखळी आहे. ते औरंगाबादमधील मुख्य स्रोत आहेत. लघु व मध्यम उद्योगांना फटका बसणे शक्य आहे. कच्चामाल घेण्यासाठी आम्ही चीनवर अवलंबून नाही; परंतु माझे जे ग्राहक आहेत, त्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. त्यामुळे त्यांचे उत्पादन कमी झाल्याने माझे उत्पादन कमी झाले आहे. दोन आव्हाने आहेत; पण त्यातून फायदा पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे पार्टस् आयात होतात. ते भारतातही उत्पादित होतात; परंतु संख्या आणि किमतीवर आपण ते उत्पादित करीत नाहीत. स्थानिक पातळीवरील उत्पादकांना आता संधी आहे. दोन ते पाच आठवड्यांसह दोन महिन्यांपर्यंत वेळ देऊन आपण सक्षम होऊ शकतो. दोन ते पाच टक्के पार्टस् सोडले, तर भारतात उत्पादन साखळी आहे. सद्य:स्थितीत साधारणत: १० ते २० टक्के परिणाम झाला आहे.
औरंगाबादचे उद्योगविश्व असे :
- 5 वसाहती; 4,000 उद्योग
- चीनकडून येणारा कच्चा माल 27 %; 2,000 एमएसएमई उद्योग
- 3 लाख रोजगार; 15 दिवसांनंतरच चित्र होणार स्पष्ट