कोरोनाच्या बाजार समितीच्या उपाययोजना कागदावरच; जाधववाडी सुरू करण्याबाबतचा निर्णय अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:24 PM2021-03-20T17:24:21+5:302021-03-20T17:25:53+5:30
Jadhavmandi opening decision pending बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही.
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीने कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचे दाखविले तर काहीही होणार नाही. कागदोपत्री उपाययोजनांमुळे जाधववाडी सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी जाधववाडी भाजी मंडई सुरू करण्याबाबत बैठक होणार होती. कृउबाच्या पदाधिकारी, प्रशासनाला बैठकीला बोलावले होते; पण बाजार समितीने निर्णय क्षमता असलेले कर्मचारी बैठकीला पाठविले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत मंडई सुरू करण्याचा निर्णय अधांतरी राहिला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, कृउबा समितीचे सभापती पठाडे हे बैठकीला आले नाहीत. बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही. ते काही करत नसतील आणि कागदोपत्री सर्व उपाययोजना दाखवत असतील तर काहीही निर्णय होणार नाही. मार्किंग कसे केले आहे, तेथे भाजी विक्रेते शेतकरी कसे बसणार आहेत, याबाबत जाधववाडीत त्यांनी काय उपाय केले याचे चित्रीकरण करण्यात येईल. त्यांनी नियोजन कागदावर केलेले आहे. त्या आवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.
सात सुरक्षा रक्षकांवर १६० दुकानांची जबाबदारी
जाधववाडीतील दुकान नं.१ ते १६० पर्यंत चार सुरक्षा रक्षकांवर तर हातगाडी, किरकोळ व्यापाऱ्यांवर नियंत्रणासाठी ३ सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी असल्याचे कार्यालयीन आदेश समितीने काढले आहेत. सोशल डिस्टन्सिंगनुसार फळे व भाजी विक्रीसाठी बसण्यासाठी हे सुरक्षा रक्षक काम करतील. असे त्या आदेशात म्हटले आहे. सात सुरक्षा रक्षक गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न आहे.
सर्व बाबींचे चित्रीकरणासह माहिती घेणार
बाजार समितीने सूचनांचे पत्रक काढले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, प्रत्येकाने मास्क लावणे, मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर हाताला लावणे, हात धुण्यासाठी बाजार समिती आवारात व्यवस्था केलेली आहे, तेथे प्रत्येकाने हात धुवावेत. रेखांकन केलेल्या जागेवरच शेतमाल खरेदी-विक्री करावा. मनपाने मुख्य बाजार आवारात लावलेल्या कॅम्पमधये अॅण्टीजेन आणि आरटीपीसीआरची टेस्ट करणे प्रत्येकास बंधनकारक असेल. बाजार आवारात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी-विक्री होऊ नये. किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजार आवारात बंदी असून त्यांनी आपापल्या भागात हातगाडी किंवा नजीकच्या भाजीमंडईत शेतमाल खरेदी करावा. या सूचना बाजार समितीने केल्या असून त्याची शहानिशा जिल्हा प्रशासन चित्रीकरणासह करणार आहे.