तरुण पिढी ठरतेय कोरोनाचे टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:05 AM2021-03-24T04:05:06+5:302021-03-24T04:05:06+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, दररोज एक हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, दररोज एक हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. या नव्या रुग्णांत १८ ते ५० वयोगटातील रुग्णांचीच संख्या अधिक आहे. एकप्रकारे तरुणांनाच कोरोना टार्गेट करत आहे. पण यात बहुतांश जणांना लक्षणेच नाहीत अथवा सौम्य लक्षणे असतात. मात्र, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांसह कोरोनाची लागण झाल्याने ज्येष्ठांचे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
औरंगाबादेत १ ते ५० वर्षे वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. एकूण रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण असूनही या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बहुतांश मृत रुग्णांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाचवेळी अनेक आजारांमुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू पावलेल्या रुग्णांत ४० वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर ५१ वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.
घाटीतील शरीर विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अनिल जोशी म्हणाले, ५० वर्षांवरील व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. उपचारासाठी लवकर आल्यास रुग्णांना फायदा होतो. काहीही त्रास असेल तर तो अंगावर काढता कामा नये. लसीकरणाचाही फायदा होत आहे. त्यामुळे लस घेतली पाहिजे.
-------
दुसऱ्या लाटेत कोरोनाचे एकूण रुग्ण (१ मार्च ते २२ मार्च २०२१)
२१, ७६२
-----
शहरातील वर्षभरातील कोरोना रुग्ण
वयोगट रुग्णसंख्या
शून्य ते ५ वर्षे - ८४१
५ ते १८ वर्षे - ४,९८१
१८ ते ५० वर्षे - २८,४१५
५० वर्षांवरील - १४,०५६
---
मास्क, लस महत्त्वपूर्ण
सध्याची परिस्थिती पाहता, कोरोना रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे, तर ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मास्कचा वापर महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर प्राधान्याने केला पाहिजे. लसीकरणासाठी जे पात्र आहेत, त्यांनी लस घेतली पाहिजे.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक