coronavirus: ३९ दिवसांचा चिमुकला कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 12:49 AM2020-09-02T00:49:58+5:302020-09-02T00:50:34+5:30
जन्माला येऊन अवघे २५ दिवस झालेले असताना घरी शेक घेताना अपघाताने बाळ १५ टक्के भाजले जाते. भाजलेल्या जखमांवर उपचाराची फुंकर दिली जात नाही, तोच कोरोनाचेही निदान होते
औरंगाबाद : जन्माला येऊन अवघे २५ दिवस झालेले असताना घरी शेक घेताना अपघाताने बाळ १५ टक्के भाजले जाते. भाजलेल्या जखमांवर उपचाराची फुंकर दिली जात नाही, तोच कोरोनाचेही निदान होते; परंतु भाजलेल्या जखमा आणि कोरोनावर या शिशूने १४ दिवसांच्या उपचाराने मात केली.
घाटी रुग्णालयातील सर्जरी विभागात म्हाडा कॉलनी येथील अवघ्या २५ दिवसांचे बाळ भाजलेल्या अवस्थेत दाखल झाले होते. घरी शेक घेताना बाळ भाजले गेल्याचे सांगण्यात आले. कोवळ्या अंगावर भाजलेल्या जखमांनी बाळाची प्रकृती चिंताजनक झाली होती. इतक्या कमी वयाच्या शिशूवर उपचार करण्याचे आव्हान पेलत डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यात बाळाच्या आईला कोरोनाची लक्षणे आढळून आली. तपासणीअंती कोरोनाचे निदान झाले. त्यामुळे बाळाचीही तपासणी करण्यात आली. तपासणीत बाळही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे भाजलेल्या जखमा आणि कोरोना या दोन्हींवर सर्जरी विभाग, बालरोग विभागातील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. भाजलेल्या जखमांमुळे शिशूला संसर्ग होण्याचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.
जखमाही झाल्या बऱ्या
आईला शेक देताना बाळ भाजले होते. भाजलेल्या जखमा बºया झाल्या आहेत. कोरोनावरील उपचारही देण्यात आले. भाजलेल्या जखमांचे डाग काही दिवसांनंतर जातील. प्रकृती चांगली झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. -डॉ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी