CoronaVirus : औरंगाबादमध्ये ४४ कोरोना बाधित; आज चार रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 09:33 PM2020-04-24T21:33:00+5:302020-04-24T21:34:07+5:30
भिमनगर भावसिंगपुरा, आसिफिया कॉलनी, समतानगर येथील प्रत्येकी एक तरुणासह महिलेचा अहवाल कोव्हीड-१९ सकारात्मक आला.
औरंगाबाद ः कोरोना पाॅझीटीव्ह असलेल्यांच्या संपर्कातील चार जण बाधित झाल्याचे शुक्रवारी समोर आले. भिमनगर भावसिंगपुरा, आसिफिया कॉलनी, समतानगर येथील प्रत्येकी एक तरुणासह महिलेचा अहवाल कोव्हीड-१९ सकारात्मक आला. अशी माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४४वर पोहचली. यातील २२ जण कोरोनामुक्त झाले असुन पाच जणांचा मृत्यु झाला आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या १७ पाॅझिटीव्ह रुग्णांपैकी समता नगरातील कोरोनाबाधीतांची संख्या आठवर पोहचली. संपर्कातून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहराच्या रेडझोनमधून बाहेर पडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नवे रुग्ण वाढणे थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणेलाही घाम फुटला आहे. एकीकडे शहरातील जोखीमेच भाग १८ वरुन सहा वर आले. मात्र, जोखीमेचे भाग कमी झाले असले तरी त्यातील संसर्ग वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
भिमनगर भावसिंगपुरा येथील वृद्ध महिलेचा २१ एप्रिलला मृत्यु झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराला गर्दी जमली होती. १३ तासानंतर त्या महिलेचा अहवाल कोरोना पाॅझीटीव्ह आला. त्यामुळे भयकंप निर्माण झाला होता. गुरुवारी वृद्ध महिलेची ४५ वर्षीय सुनेला कोरोनाची बाधा झाली. तर शुक्रवारी त्यांच्या संपर्कातील २७ वर्षीय युवकाला लागण झाल्याचे समाेर आले. आसिफिया कॉलनी येथील कोरोनाबाधीत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या संपर्कातील ३५ वर्षीय युवकाला कोरोना अहवाल सकारात्मक आला. तर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास समतानगर येथील २४ वर्षीय युवकासह ३७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.