coronavirus : मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘एबीसी’ प्लॅन; घाटी रुग्णालयात होणार अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 06:51 PM2020-07-23T18:51:41+5:302020-07-23T18:53:13+5:30
रुग्णांनी आजार गंभीर होण्यापूर्वीच रुग्णालयात येण्याची गरज असल्याचे डॉ. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांची देखरेख महत्त्वाची ठरते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे राऊंड वाढले पाहिजेत. यासाठी ‘एबीसी’ प्लॅन असून, त्याचा वापर घाटीत करण्याची सूचना केल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.
कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अभ्यास, मार्गदर्शन आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी डॉ. डांगे यांनी मंगळवारी घाटीत बैठक घेतली. यावेळी डॉ. डांगे यांनी घाटीत आतापर्यंत दाखल झालेल्या, उपचार घेऊन बरे झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला. घाटीत ‘डेथ आॅडिट’ होते का, अशी विचारणा डॉ. डांगे यांनी केली. तेव्हा दर मंगळवारी हे आॅडिट होत असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात येत आहे. ही बाब औरंगाबादेतही शक्य आहे. त्यासाठी रुग्णांनी आजार गंभीर होण्यापूर्वीच रुग्णालयात येण्याची गरज असल्याचे डॉ. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काय आहे ‘एबीसी‘ प्लॅन
रुग्ण दाखल झाल्यानंतर काही ठराविकच डॉक्टर रुग्णांचे राऊंड घेतात. त्यातून उपचाराला मर्यादा येते. डॉक्टर थकून जातात. ही बाब टाळण्यासाठी ‘एबीसी’ प्लॅन आहे. यात कोणत्या डॉक्टरांनी, पथकांनी कधी राऊंड घ्यावे, याचे नियोजन असल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले.
लवकरच कार्यान्वित
‘डीएमईआर’ने ‘एबीसी’ प्लॅन तयार केला आहे. लवकरच तो घाटीत कार्यान्वित केला जाईल. कोणी, किती राऊंड घ्यावे, यासंदर्भात त्यात गाईडलाईन आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.