coronavirus : मराठवाड्यात लिक्विड ऑक्सिजनसाठी प्रशासनाची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 01:14 PM2020-09-08T13:14:14+5:302020-09-08T13:21:56+5:30
लिक्विड ऑक्सिजनसाठी नागपूर, रायगड, पुण्याशी प्रशासनाचा संपर्क सुरू
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी रुग्ण आॅक्सिजनवर आहे असे म्हटले तरी भयकंप होत असे; परंतु आता एकेका गंभीर रुग्णाला ६० लिटरपर्यंत लिक्विड आॅक्सिजन लागत आहे. परिणामी, मराठवाड्यात लिक्विड आॅक्सिजनसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सोमवारी विभागीय प्रशासनाने राज्यातील सर्व आॅक्सिजन उत्पादक कंपन्यांशी संपर्क केला, तसेच विभागातील औद्योगिक कारणास्तव उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचा ८० टक्के साठा कोरोना उपाययोजनेत उपलब्ध होईल, यासाठी कार्यवाहीच्या सूचनादेखील केल्या. यासाठी एका उपायुक्तावर जबाबदारी देण्यात आली आहे. औरंगाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचे आणि गंभीर रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे लिक्विड आॅक्सिजनही जास्त प्रमाणात लागत आहे. नागपूरच्या बुटीबोरी येथील प्रकल्पातून नांदेडपर्यंत लिक्विड आॅक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा होतो. तेथून विभागात काही जिल्ह्यांमध्ये पुरवठ्याची साखळी आहे. पुणे आणि रायगडमधून इतर राज्यांतही पुरवठा होतो आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. विभागात सर्व मिळून कोरोना पॉझिटिव्ह ६७ हजार ३८० रुग्णसंख्या आहे. होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असलेल्यांची संख्या ९६ हजार ६१६ पर्यंत गेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी गंभीर रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
आयुक्तांनी केला सर्वांशी संपर्क
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आॅक्सिजन पुरवठ्याबाबत नागपूर, पुणे प्रशासनाशी संपर्क करून माहिती घेतली, तसेच उपायुक्त मीना सुपेकर यांच्यावर औद्योगिक कारणासाठी आॅक्सिजन उत्पादन करणाºया कंपन्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी दिली. ज्या कंपन्यांना उत्पादनासाठी अखंड वीजपुरवठा होत नाही, त्यांना वीजपुरवठा केला जावा याबाबत महावितरणच्या वरिष्ठांशीदेखील आयुक्त केंद्रेकर यांनी संपर्क करून माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाचपट ऑक्सिजन कोरोना रुग्णाला
कोरोना रुग्णाला सध्या पाचपट जास्त आॅक्सिजन लागत आहे. सामान्य रुग्णाच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. सध्या औरंगाबादमध्ये आॅक्सिजनबाबत काहीही अडचण नाही. विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तुटवडा असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. कोरोनाने ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ज्या रुग्णाला कवेत घेतले आहे, त्या एकेका गंभीर रुग्णाला ६० लिटरपर्यंत लिक्विड आॅक्सिजन लागत आहे. त्यामुळे तुटवडासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.