CoronaVirus : कौतुकास्पद ! कोरोना विरुद्ध लढाईत खाजगी डॉक्टरने मिनी घाटीत स्विकारली विनामूल्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 06:34 PM2020-04-25T18:34:04+5:302020-04-25T18:43:41+5:30

कोरोना रुग्णांची सेवा करण्याची इच्छा

CoronaVirus: Admirable! Private doctor accepts free service in District Corona Hospital Aurangabad | CoronaVirus : कौतुकास्पद ! कोरोना विरुद्ध लढाईत खाजगी डॉक्टरने मिनी घाटीत स्विकारली विनामूल्य सेवा

CoronaVirus : कौतुकास्पद ! कोरोना विरुद्ध लढाईत खाजगी डॉक्टरने मिनी घाटीत स्विकारली विनामूल्य सेवा

googlenewsNext
ठळक मुद्देघरात लहान मुलगा, वयोवृद्ध वडिल असतानाही केले धाडस मन शांत बसू देत नव्हते

- राम शिनगारे 
औरंगाबाद : डॉक्टर म्हणजेच सेवा. रुग्णांचा जिव वाचविणे हेच त्यांचे कर्तव्य. कोरोनाचे संकट जगभर पसरले असताना डॉक्टरांना देवदूत मानू लागले आहेत. स्वत:चा जिव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी करत आहेत. यात आपलाही खारीचा वाटात असावा म्हणून  खाजगी प्राक्टिस करत असलेल्या  मुकूंदवाडीतील एका डॉक्टरने चक्क दवाखाना बंद करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या मिनी घाटीमध्ये विनामुल्य सेवा बजावण्यास सुरूवात केली आहे. 

औरंगाबाद शहरातील मुकूंदवाडी - संजयनगर भागात डॉ. प्रशांत महाले यांचा दवाखाना आहे. त्यांची पत्नी डॉ. शितल मोरे या सुद्धा डॉक्टर आहेत. कोरोना रुग्णांची लागण होण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात कम्युनिटी हेल्थ आॅफिसर ही पदे भरण्यात आली होती. यात डॉ. मोरे यांची निवड झाली. कोरोनाचा प्रादूर्भाव पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर शासनाने मिनी घाटी रुग्णालयात  कोरोना पॉझिटिव्ह रूग्णावर उपचार सुरू केले. याठिकाणी डॉ. मोरे यांची ड्यूटी लागली. त्यामुळे त्यांचे पती डॉ. प्रशांत महाले हे त्यांना सोडणे आणि घेऊन जाण्यासाठी  येत असत. यातच शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. मिनी घाटीत सुरू असलेली धावपळ डॉ. महाले हे दररोज पत्नीला सोडण्यास आणि घेऊन जाण्यास येताना पाहत होते. आपणही डॉक्टर आहोत. या संकट काळात आपण विनामुल्य सेवा केली पाहिजे, असे त्यांच्या मनाने ठरविले. घरात तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. वयोवृद्ध असून, त्यांना डायबिटीज, दमा असे आजार आहेत. तरीही त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी स्वत:चा सुरू असलेला खाजगी दवाखाना बंद ठेवला. मिनी घाटीतील डॉ. कांबळे यांची भेट घेऊन याठिकाणी विनामूल्य काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा डॉ. कांबळे यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी एक अर्ज लिहण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या नावाने अर्ज केला. डॉ. कुलकर्णी यांची अर्ज घेऊन भेट घेतली असता, त्यांनी सेवा करण्यास तात्काळ मंजूरी दिली.

यानुसार मागील १२ दिवसांपासून डॉ. महाले हे मिनी घाटीमध्ये येणाºया रुग्णांचे स्क्रिनिंग करणे, फॉर्म भरून घेण्यासह अधिकारी सांगतील ती इतर कामे आनंदाने करत आहेत. त्यांनी पत्नीसोबत ड्यूटी लावल्याची विनंती केली असता जिल्हा आरोग्य प्रशासनाने दोघा पती-पत्नी डॉक्टरांची एकाच वेळेत ड्यूटी लावली आहे. ड्यूटी करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा मिनी घाटीत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच हाय रिस्क असलेल्या भागात प्रशिक्षीत डॉक्टर, कर्मचाºयांना जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे इतर कामे आनंदाने करत असल्याचेही डॉ. महाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मन शांत बसू देत नव्हते 

कोरोनाचे संकट आल्यापासून खाजगी दवाखाना बंद केलेला नव्हता. व्यवस्थित काळजी घेऊन सुरूच ठेवला होता. रूग्णसेवा हेच प्रथम कर्तव्य पहिल्यापासून पाळत आलो आहे. यातच पत्नी दररोज मिनी घाटीमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करण्यास जाते. पत्नी काम करत असून, आपण त्यात काही तरी योगदान दिले पाहिजे, असे वाटत होते. त्यामुळे स्वत:हून अर्ज करत विनामूल्य सेवा करण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. प्रशांत महाले यांनी सांगितले. या दवाखान्यात काम केल्यानंतर डॉक्टर बनल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते, असेही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही पती-पत्नी घरी जाण्यापूर्वी रस्त्यातुनच फोन करून सांगतो. आम्ही येत आहोत म्हणून. त्यानंतर घरात गेल्यानंतर सर्व कपडे निर्जंतवणूक केल्यानंतरच इतरांशी संवाद साधतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: Admirable! Private doctor accepts free service in District Corona Hospital Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.