coronavirus : कौतुकास्पद ! सिल्लोडकरांनी औक्षण करून आरोग्य पथकावर केली पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:04 PM2020-05-06T19:04:40+5:302020-05-06T19:05:19+5:30
तीन दिवसात सिल्लोडमध्ये 15 हजार नागरिकांची केली स्क्रीनिंग ...
सिल्लोड : एकीकडे स्क्रीनिंग व कोरोनाची तपासणी करणाऱ्या आरोग्य पथकाला विरोध केला जात आहे मात्र सिल्लोड येथे स्क्रीनिंगसाठी गेलेल्या पथकाला वेगळाच अनुभव आला. घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी करून स्क्रीनिंग करणाऱ्या या डॉक्टरांच्या पथकावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत आहे. काही महिलांनी तर डॉक्टरांचे औक्षण करून त्यांच्या कार्याला वंदन केले.
नागरिकांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. या पथकाने तीन दिवसात 15 हजार नागरिकांची स्क्रीनिंग केली असून एकही कोरोना संशयीत ढळला नाही. यामुळे सिल्लोड वासीयांनी दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसात शहरातील 1 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार सिल्लोडमध्ये "डॉक्टर आपल्या दारी "अभियानास सुरुवात करण्यात आले आहे. नगर परिषद , उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड ,धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन ,जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे हे अभियान राबवले आहे. अभियानाचा बुधवारी तिसरा दिवस होता. या तीनही दिवसात किरकोळ आजार वगळता कोरोना सदृश्य किंवा ताप, सर्दी, खोकला यासारखे रुग्ण आढळून आलेले नाहीत अशी माहिती धन्वंतरी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व पथक प्रमुख डॉक्टर निलेश मिरकर यांनी दिली. स्क्रीनिंग करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याचे जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले. अभियान यशस्वीतेकडे वाटचाल करीत असल्याची माहिती अब्दुल समीर यांनी दिली.