coronavirus : आधीच दु:खाचा डोंगर अन् कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:28 PM2020-07-25T19:28:37+5:302020-07-25T19:29:09+5:30
सर्व जण उपचारासाठी भरती असताना खाजगी रुग्णालयात घरातील कर्त्या ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबाद : अंगुरीबाग येथील ६५ वर्षीय वृद्ध आजारपणात १२ जुलैला दगावले. घरात दु:खाचे सावट असतानाच कुटुंबात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला. मयत वृद्धाचा मोठा मुलगा १६ जुलैला खाजगी रुग्णालयात भरती झाला. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच कुटुंबियांच्या स्क्रीनिंगमध्ये सर्वच ११ जण पॉझिटिव्ह आले. सर्व जण उपचारासाठी भरती असताना खाजगी रुग्णालयात घरातील कर्त्या ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
बाधितांमध्ये मृत मुलाची आई, पत्नी, काका, काकू, मुलगा, मुलगी, लहान भाऊ, भावाची पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण व त्यांचे पती पॉझिटिव्ह आल्याने सर्वच जण एमआयटीच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती झाले. तोच शुक्रवारी बाधित मुलाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयभद्रा मित्रमंडळ आणि बाबा बर्फानी मित्रमंडळ राजाबाजारचे सदस्य कुटुंबियांना धीर देत आहेत. मृतावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी लहान भाऊ आणि मुलालाच पीपीई कीट घालून उपस्थित राहता आले.