CoronaVirus : औरंगाबादमध्ये आतापर्यंत १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:36 PM2020-04-05T22:36:39+5:302020-04-05T22:37:52+5:30
त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या भागातील लोकांची तपासणी करण्यात येत असून, आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे.
औरंगाबाद : शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १०वर पोहोचली असून, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णांमध्ये एन ४मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, अरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एकाचा मृत्यूसुद्धा झाला आहे. दरम्यान, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी नागरिकांना कुठेही बाहेर न जाता घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत. त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या भागातील लोकांची तपासणी करण्यात येत असून, आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे.
औरंगाबादेत रविवारी एका ५८ वर्षीय कोरोनाबाधित बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी ठरला असून, बँक अधिकाऱ्यासह एकाच दिवशी ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात एका चिमुकलीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा, मनपा आणि जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. १३ दिवसांपूर्वीच ते शहरात आले हॊते. शहरात आल्यानंतर प्रकृती बिघडल्याने ३ मार्च रोजी सायंकाळी कोरोनाच्या संशयाने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्राव (स्वब)तपासणीसाठी घेण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्देवाने उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बँक अधिकाऱ्यासह ७ जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. यात हिमायतनगर, जलाल कॉलनी येथील ७९ वर्षीय रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णास अधिक उपचारासाठी घाटीतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी प्रयोगशाळेने संकेत शनिवारी रात्री उशिरा दिले होते. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि देवळाईतील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे या दोघांवर शनिवारी रात्रीच पॉझिटिव्ह रुग्णांवर केले जाणारे उपचार सुरू करण्यात होते. या दोघांचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.
तर खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. पदमपुरा येथील रहिवाशी असलेले ४३ वर्षीय डॉक्टर आणि पदमपुरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा रविवारी सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर डॉक्टर हे जालना रोडवरील एका खाजगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी (आर एम ओ) म्हणून कार्यरत आहेत.
१) आरेफ कॉलनी येथील ४५ वर्षीय महिला
२) देवळाई येथील ३८ वर्षीय वाहनचालक
३) सह्याद्रीनगर येथील ५८ वर्षीय बँक अधिकारी-मृत्यू
४)जलाल कॉलनी, हिमायतनगर येथील ७९ वर्षीय व्यक्ती
५) एन- ४ येथील सात वर्षीय मुलगी
६) पदमपुरा येथील ४३ वर्षीय डॉक्टर
७) रोशन गेट येथील ३७ वर्षीय व्यक्ती
८) एन - ४ येथील पोजिटिव्ह महिला
९) आरेफ कॉलनी येथील पॉझिटिव्ह तरुण
१०) शहरातील पहिली पॉझिटिव्ह रुग्ण, प्राध्यापिका, जी आता निगेटिव्ह