coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोना पाचशे पार ; दिवसभरात ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर, नव्या भागात शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:19 PM2020-05-09T18:19:33+5:302020-05-09T18:20:01+5:30
शहर तसेच ग्रामीण भागातील नव्या परिसरात शिरकाव
औरंगाबाद : शहरात शुक्रवारी दिवसभरात १०० रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी आणखी १७ तर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरातील ३० रुग्णांची भर पडून बाधित रुग्णांची संख्या ५०८ झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयातून २२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आल्याने एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५२ झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
शनिवारी सकाळी संयजनगर- मुकुंदवाडी ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील काॅलनी व रामनगर येथील प्रत्येकी एक अशी १७ रुग्ण आढळून आली. यात १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांचा समावेश आहे. दुपारी आढळलेल्या तिघांत सातारा परिसरातील ५० वर्षीय पुरुष, पंचकुवा किलेअर्क येथील ३५ वर्षीय महिला, जुना बाजार येथील ७५ वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे. तर त्यानंतर आढळून आलेल्या दहा रुग्णांमध्ये गंगापूरमधील १ आणि पुंडलिक नगर येथील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे आज दिवसभरात एकूण ३० रुग्णांची भर पडून एकूण रुग्ण संख्या ५०८ वर गेली आहे. वाढलेली रुग्णसंख्या आणि नवीन भागात रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
२२ रुग्ण झाले कोरोनामुक्त
पैठणगेट येथील पाच, नुर काॅलनी येथील सहा, समतानगर येथील दोन, किलेअर्क येथील तीन, चेलीपुरा येथील एक, बडा तिकीया मशिद परिसरातील एक, भिमनगर येथील एक, दाैलताबाद येथील एक, एसआरपीएफ जवान व जलाल काॅलनी येथील एक जण कोरोनामुक्त झाला असून त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.