Coronavirus In Aurangabad : दूध, वर्तमानपत्र वगळता सर्व बंद; रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:00 PM2020-07-08T20:00:17+5:302020-07-08T20:02:22+5:30
संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. या काळामध्ये सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये नागरिकांना दूध आणि वर्तमापत्र उपलब्ध होईल. याशिवाय कोणत्याही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. यादृष्टीने विचारविमर्श सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. संचारबंदीच्या काळामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दोन शिफ्टमध्ये पोलिसांना सहकार्य करणार आहेत.
संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. मागील शहर पोलिसांना संचारबंदीत महापालिकेचे दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये मदत करणार आहेत. २० पॉइंटवर लॉकडाऊन सहायक, लॉकडाऊन सुपरवायझर, ५० ठिकाणी सेक्टर आॅफिसर यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी काही आॅब्झर्व्हर नेमण्यात येणार आहेत. शासकीय पेट्रोल पंप वगळता काही पंप चालू ठेवण्यासंदर्भात इतर पेट्रोल पंपचालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच इंधन मिळेल.
रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवरही गुन्हे : संचारबंदीच्या काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्यांविरुद्धही यावेळी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पाण्डेय यांनी स्पष्ट केले. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात विविध कारणांनी लोक पायी फिरत होते.
मोटारसायकल जप्त होणार : संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे दुचाकी किंवा इतर वाहन रस्त्यावर आल्यास ते जप्त केले जाणार आहे. शिवाय वाहनधारकांचा परवाना जप्त करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल होणार आहेत. यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची टेस्ट
संचारबंदीच्या काळामध्ये नागरिकांनी शहरात येण्याचे टाळावे. विविध प्रमुख मार्गांवर महापालिका मोबाईल टीम उभी करणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची जागेवरच कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
वर्तमानपत्रांकडून यादी मागवणार : संचारबंदीच्या काळामध्ये शहरातील प्रमुख वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगून आम्ही यादी मागून घेणार आहोत. वर्तमानपत्रांकडून आलेल्या यादीनुसार संबंधितांना पास देण्यात येतील. पास नसलेल्या पत्रकारांना बाहेर पडता येणार नाही. सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वर्तमानपत्र वितरणास परवानगी असेल.