Coronavirus In Aurangabad : चेकपोस्ट नुसते देखावे; शहरात परजिल्ह्यातून वाहने येतात बिनदिक्कत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 08:20 PM2020-07-08T20:20:42+5:302020-07-08T20:21:44+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारे लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केली जाते, हे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंंग आॅपरेशनमुळे उघडकीस आले आहे.
औरंगाबाद : जिल्हा बदली करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष पास देण्यात येत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्हा हद्दीत ठिकठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर तैनात अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांकडून कोणतीही चौकशी केली जात नाही. चेकपोस्टवर वाहन तपासणीच होत नसल्याने बिनदिक्कत इतर जिल्ह्यांतील नागरिक औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारे लॉकडाऊन नियमांची पायमल्ली केली जाते, हे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंंग आॅपरेशनमुळे उघडकीस आले आहे.
कायगाव चेकपोस्टवर वाहन तपासणीचा देखावा
कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील जुने कायगावच्या चेकपोस्टवर पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाचे कर्मचारी नसल्याने वाहन तपासणीचा फज्जा उडाला आहे. सोमवारी दुपारी २.३० वाजेपासून तर ३.३० वाजेपर्यंत १ तासाच्या कालावधीत जुने कायगाव चेकपोस्टवर औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करून तब्बल ७४ कार आणि १४४ दुचाकी विनातपासणी निघून गेल्या, तर या तासाभरात उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी ४६ कारचालकांना आणि २ दुचाकीधारकांना थांबवून त्यांची तोंडी चौकशी केली आणि पुढे जाऊ दिले. यावेळेत पास आणि इतर कागदपत्रे तपासणीसाठी, तसेच त्याची नोंदणी करण्यासाठी फक्त १३ वाहने थांबली होती. यात एकही दुचाकी नव्हती, हे विशेष. चेकपोस्टवर पोलीस विभागाचे ४ आणि महसूलचा एकच कर्मचारी उपस्थित होता. मात्र, तो कर्मचारीसुद्धा ३.३० वाजता निघून गेला. पुढे तासभर येथे त्याच्या जागेवर महसूलचा एकही कर्मचारी नव्हता. त्यामुळे नोंदी घेणे बंद झाले.
कन्नड-चाळीसगाव रस्त्यावरील नाका फक्त नावापुरताच
कन्नड : औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेला तपासणी नाका फक्त नावापुरताच आहे. येथून जाणाऱ्या-येणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या वाहनांची तपासणी केली जाते. कन्नड-चाळीसगाव रस्त्यावरील घाटाजवळील तपासणी नाक्याजवळ सोमवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी जाऊन सुमारे तासभर वाहन तपासणीचे स्टिंग आॅपरेशन केले. हा रस्ता खान्देश, मध्यप्रदेश, गुजरात यांना जोडणारा असल्याने आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या नाक्यास विशेष महत्त्व आहे. या चौकीवर एक महिला व पुरुष रजिस्टर घेऊन नोंदी करण्यासाठी बसलेले होते, तर एक गणवेशधारी पोलीस व वाहतूक शाखेचा गणवेशधारी पोलीस रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी साध्या वेशातील दोन पोलीस चौकीतून निघाले आणि गाडीत बसून ढाब्यावर चालकासह जेवायला गेले. त्यानंतर १० मिनिटांनी गणवेशधारी पोलीसही जेवायला बसला. चौकीवर फक्त वाहतूक शाखेचा पोलीस व नोंदी करणारी महिला व पुरुष होते. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी असते. वाहतूक पोलीस मधूनच चारचाकी जीप अथवा कारला थांबवून चौकशी करायचा. मात्र, तोपर्यंत रस्त्यावरून दोन-चार वाहने विनातपासणीची निघून जात होती.
औरंगाबाद-नाशिक चेकपोस्ट सर्वांसाठी खुले
वैजापूर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी वैजापूरजवळ दोन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील उक्कडगाव येथे असलेले चेक पोस्ट कर्मचार्Þयांअभावी बंद असून, येथून बिनधास्त वाहतूक सुरू आहे, तर दुसरीकडे नागपूर-मुंबई महामार्गावरील नांदगाव येथील नाक्यावर एक तास पाहणी केली असता ३५ चारचाकी वाहने व ४८ दुचाकी नाक्यावरून रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी या वाहनांची कुठलीही तपासणी किंवा चौकशी केली नाही. त्यांच्याकडे ई-पास आहे का? वाहनातून प्रवासी कुठले रहिवासी आहेत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. वैजापूर शहरात सर्वात पहिले सापडलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे नाशिक जिल्ह्यातून नांदगाव चेकपोस्टवरून नेहमी माल वाहतूक करीत होते, हे विशेष.
औरंगाबाद-जालना चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांची कमतरता
शेकटा : औरंगाबाद-जालना महामार्गावर करमाड पोलीस ठाण्याचे चेकपोस्ट असून, येथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे जालन्याकडून येणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी करणे पोलिसांना अवघड जात आहे. या चेकपोस्टवर दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सूट देण्यात आलेली आहे. त्यांना न थांबवता सरळ पुढे सोडण्यात येत आहे, तर चारचाकी वाहनांना चेकपोस्टवर थांबवून पास किंवा इतर कागदपत्रे याबाबत चौकशी केली जात असल्याचे आढळून आले. या चेकपोस्ट ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने अर्धा तास पाहणी केली असता ५२ दुचाकीस्वार विनाचौकशी औरंगाबाद शहरात दाखल झाले, तर चारचाकी ३५ वाहनांची तपासणी करण्यात आली.