Coronavirus In Aurangabad : शहरात आता अँटिबॉडी टेस्ट होणार; महापालिकेचे नियोजन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:08 PM2020-07-27T17:08:44+5:302020-07-27T17:13:51+5:30
शनिवारी केंद्रीय पथक शहरात पाहणीसाठी आले होते. या पथकाने महापालिकेला अँटिबॉडी टेस्ट करण्याचा सल्ला दिला.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरात कोरोनाचे संक्रमण किती वाढले आहे, याची माहिती मिळविण्यासाठी महापालिका दहा हजार नागरिकांची अँटिबॉडी टेस्ट करणार आहे. केंद्रीय पथकाने शनिवारी महापालिकेला निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका नागरिकाच्या टेस्टसाठी साधारण तीन हजार रुपये खर्च येणार आहे. दहा हजार तपासण्यांचा खर्च तीन कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अँटिबॉडी टेस्टला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरात महापालिकेने सर्वप्रथम लाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे तंत्र अवलंबले. एका व्यक्तीसाठी साधारण तीन हजार रुपये, असा या तपासणीचा खर्च आहे. त्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अँटिजन टेस्टचा निर्णय घेतला. मागील तीन आठवड्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. शहरात महापालिकेने ९० हजारांहून अधिक नागरिकांची टेस्ट केली. त्यात साडेबारा हजारांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले.
शनिवारी केंद्रीय पथक शहरात पाहणीसाठी आले होते. या पथकाने महापालिकेला अँटिबॉडी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. यानंतर लगेचच महापालिकेने नियोजन सुरू केले. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शंभर नागरिकांचा ग्रुप करून तपासणी करण्यात येईल. या तपासणीत घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यावरून साधारणत: अडीच तासांमध्ये अहवाल प्राप्त होतो. घाटी रुग्णालयात अँटिबॉडी तपासणीची व्यवस्था आहे.
अँटिबॉडी टेस्ट म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस आल्यानंतर शरीरात आपोआप त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडी तपासणीसंबंधित व्यक्तीला कोरोना झाला होता का, तसेच त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची सूक्ष्म माहिती मिळेल. ज्यांच्या शरीरात व्हायरस दिसणार नाही त्यांना कोरोनाची भीती अधिक असेल. एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेलेला असेल तरी दोन आठवड्यांनंतर त्याचा शोध लावता येऊ शकतो. मात्र, अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर टेस्टमध्ये काहीही कळत नाही.
प्लाझ्मा थेरपीसाठी फायदा
एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या असतील, तर प्लाझ्मा थेरपीसाठी अशा व्यक्तीचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असेही महापालिकेतील सूत्रांनी नमूद केले. शहरात किमान एक टक्का नागरिकांची तपासणी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
अँटिबॉडी टेस्टमध्ये ज्या नागरिकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यासंदर्भात घाबरण्याचे कोणतेही कारण नसते. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या शरीरात कोरोनाचे व्हायरस किती प्रमाणात आहेत किंवा त्याला कोरोना कधी झाला होता, हे कळेल. टेस्ट घेतलेल्या नागरिकाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीने मनपा उपचारासाठी नेणार नाही.