coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 07:09 PM2020-05-15T19:09:37+5:302020-05-15T19:11:32+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस सर्व काही राहणार बंद
औरंगाबाद : लॉकडाऊनसाठी १७ मेपर्यंत असलेली सम-विषम शिथिलतेची सूट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द करीत १७ मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश काढल्याचे विभागाकडून कळविण्यात आले.
१ मेपासून सम-विषम तारखांना बाजारपेठा चालू-बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयात सम तारखांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत होती. या सवलतीत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी पडू लागली. परिणामी, १०० रुग्णांच्या आत असलेली कोरोना रुग्णसंख्या सध्या ७५०पर्यंत पोहोचली आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढत गेला; परंतु सम-विषम तारखांचा लॉकडाऊन नियम काही बदलला गेला नाही.
*आज रात्री12 वाजेपासून ते 17तारखेच्या मध्यरात्री 12वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत,कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
— Astik Kumar (@astikkp) May 14, 2020
सर्व प्रकारचे पास रद्द
केंद्रेकर यांनी येणाऱ्या तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. साफसफाई, वीज, पाणीपुरवठा, हॉस्पिटल, मेडिकल सेवा सुरू राहील. ज्यांना शहरात फिरण्यासाठी सवलतीचे पास दिले आहेत, ते पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. सध्यातरी पुढील ७२ तासांसाठी शहरात १०० टक्के संचारबंदी असणार आहे. १७ मेनंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय होतील.
पोलीस करणार गुन्हे दाखल
लॉकडाऊन तीन अंतिम टप्प्यावर आहे. संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. आयुक्त म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये तीन दिवस पूर्ण संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. शहरामध्ये सम आणि विषम तारखांचा निर्णय रद्द झाला आहे. उद्या १५ मेपासून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे वाहन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.