औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:39 PM2020-05-28T19:39:24+5:302020-05-28T19:41:43+5:30
यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनामुळे शहरात रोज रुग्णांचा मृत्यू होत आहे. या १५ दिवसांत तब्बल ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. धक्कादायक म्हणजे या कालावधीत मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ टक्के झाला. परिणामीे, चिंता व्यक्त होत आहे.
शहरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ६३ झाली आहे. शहरात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. या तारखेपर्यंत शहरात मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, १३ मेपासूनचा प्रत्येक दिवस शहराची चिंता वाढविणारा ठरत आहे. कारण या दिवसापासून शहरात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रोज मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.
५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक मृत्यू
शहरात आतापर्यंत ३२ ते ९४ या वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यात एकूण ६३ मृत्यंूपैकी ५१ ते ८० या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ४९ मृत्यू झालेले आहेत. बहुतांश रुग्णांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आदी गंभीर आजार होते. या आजारांमुळे रुग्णांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने मृत्यू ओढवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत्यू रोखण्याचे आव्हान
शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अतिगंभीर रुग्णांना फायदेशीर ठरणारे ३५ हजारांचे इंजेक्शन देण्यासह अनेक उपाय केले जात आहेत; परंतु मृत्यूचे सत्र थांबविण्यात अपयश येत आहे. आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान उभे आहे.