Coronavirus In Aurangabad : ‘एसआरपी’च्या ३६ जवानांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:17 IST2020-07-20T18:08:55+5:302020-07-20T18:17:58+5:30
दीड महिन्यापूर्वी येथील भारत बटालियनच्या १०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची तुकडी भुसावळ येथे कोविड बंदोबस्तासाठी गेली होती.

Coronavirus In Aurangabad : ‘एसआरपी’च्या ३६ जवानांना कोरोनाची लागण
औरंगाबाद : येथील राज्य राखीव पोलीस दलातील ‘सी’ कंपनीच्या ३६ जवानांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दीड महिन्यापूर्वी येथील भारत बटालियनच्या १०४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची तुकडी भुसावळ येथे कोविड बंदोबस्तासाठी गेली होती. तेथे यातील ५२ जवान कोरोनाबाधित झाले. त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांची प्रकृती सुधारत आहे. बंदोबस्ताचा कालावधी पूर्ण करून उर्वरित ५२ जवान शुक्रवारी औरंगाबादेत परत आले. परतलेल्या ५२ जवानांचे शनिवारी (दि.१८) मनपाकडून स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ३६ जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर उर्वरित १६ जवानांना बटालियन परिसरातील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोविड बंदोबस्त जवानांच्या मुळावर
यापूर्वीही मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेले ७२ जवान कोरोनाबाधित झाले होते. ३० मार्च रोजी औरंगाबाद भारत बटालियनच्या जवानांची ‘डी’ कंपनी लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी मालेगाव येथे रवाना झाली.दीड महिन्याचा बंदोबस्त पूर्ण करून ५ मे रोजी ही कंपनी औरंगाबादेत परतली. तेव्हा तब्बल ७२ जवान कोरोनाबाधित झाल्यामुळे खळबळ उडाली होती.