Coronavirus In Aurangabad : शहरात तीन दिवसांत पाच हजारांवर अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 06:56 PM2020-07-14T18:56:02+5:302020-07-14T19:01:09+5:30
याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.
औरंगाबाद : शहरात विविध भागांत अँटिजन टेस्टद्वारे कोरोनाचे निदान केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत ५ हजार ८३० नागरिकांनी याद्वारे तपासणी करून घेतली. याशिवाय नियमित तपासणी होणारी संख्या वेगळी आहे.
एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे, तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असल्याची परिस्थिती कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर पाहायला मिळाली. तेव्हा कोरोना संसर्गाची लक्षणे असलेली व्यक्ती आजार लपवीत, तपासणीसाठी लवकर पुढे येत नव्हती. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात जात होत्या. परिणामी या संसर्गाचे निदान होण्यास विलंब होतो. डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि जीव गमावण्याची वेळ ओढवते. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वत:हून पुढे येऊन माहिती देण्याचे, आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.
वेळीच उपचार शक्य : नागरिक सध्या स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत आहेत. ही एक चांगली बाब आहे. कारण त्यातून वेळीच रुग्णांवर उपचार करणे शक्य होत आहे. प्रकृती गंभीर होण्याची वेळ त्यामुळे येत नाही.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय