Coronavirus In Aurangabad : सर्वसामान्य जनतेप्रमाणे लोकप्रतिनिधींसाठीही असेल लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 04:51 PM2020-07-09T16:51:41+5:302020-07-09T16:56:46+5:30
शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
औरंगाबाद : १० ते १८ जुलैदरम्यान शहरात राबविण्यात येणारे लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही असेल, अशी माहिती पोलीस प्रशासकीय सूत्रांनी दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. लॉकडाऊनसाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला होता. प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मोठी तयारी केली. ९ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये केवळ दूध आणि वर्तमानपत्र विक्रेत्यांना सकाळी दोन तास परवानगी मिळणार आहे.
आस्थापने व दुकाने बंद असतील. शिवाय अन्नधान्य वाटप करण्यासाठी यापूर्वी दिलेले पास रद्द करण्यात आले असून नव्याने पास दिले जाणार नाहीत. लॉकडाऊनमध्ये लोकप्रतिनिधींनाही सामान्य जनतेप्रमाणे पालन करावे लागेल, असे पोलीस सूत्रानी सांगितले. लोकप्रतिनिधींना पास दिल्या तर आणखी लोक पासेसची मागणी करतील. यामुळे पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसेल. परिणामी, लॉकडाऊनचा उद्देश सफल होणार नाही.