coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ ते ८० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:25 PM2020-06-11T19:25:30+5:302020-06-11T19:26:47+5:30
कोरोनाबाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटातील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. या वयोगटातील तब्बल ८८ लोकांचा या महामारीने बळी घेतला. कोरोनाबाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ७ होती; परंतु मे महिना उजाडला आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. जून महिना उजाडला आणि मयत रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मयत रुग्णांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आले आहे. यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारांमुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
चाळिशीखालील मृत्यू कमी
कोरोनामुळे शहरात मृत्यू पावलेल्या रुग्णांत ४० वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे, तर ५१ वर्षांवरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.
केवळ नावाला तपासणी : शहरात घरोघरी जाऊन ज्येष्ठांच्या शरीराचे तापमान आणि आॅक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. तपासणीदरम्यान त्यांचे आरोग्य बरे नसले तरी संबंधितांना कोणतीही सूचना केली जात नाही. ज्येष्ठांच्या अन्य आजारांचीही कोणतीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे ज्येष्ठांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत.
सर्वेक्षण सुरू, डेथ आॅडिट करणार
शहरात नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी अॅपची मदत घेतली जात आहे. त्यातून कोणाला त्रास असेल तर लवकरात लवकर उपचार करता येऊ शकेल. मयत रुग्णांत मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या अधिक आहे. समितीच्या माध्यमातून डेथ आॅडिटही केले जाणार आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
वयोमानानुसार मृत्यू
वयोमान मृत्यू
२१ ते ३० १
३१ ते ४० ८
४१ ते ५० १६
५१ ते ६० ३३
६१ ते ७० ३४
७१ ते ८० २१
८० वरील ८