Coronavirus In Aurangabad : खाजगी रुग्णालयांनी गंभीर रुग्णांना प्रथम प्राधान्याने खाटा द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 07:45 PM2020-07-14T19:45:23+5:302020-07-14T19:46:22+5:30
खाजगी रुग्णांलयातील कोविड-१९ च्या उपचार सुविधांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
औरंगाबाद : कोरोना रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या, तसेच विशेष त्रास नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, अशा रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार होत आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी गंभीर स्थितीतील कोरोनाबाधित रुग्णांना प्रथम प्राधान्याने खाटा (बेडस्) उपलब्ध करून द्याव्यात, असे साकडे जिल्हा प्रशासन आणि मनपाने खाजगी हॉस्पिटल्सना घातले.
खाजगी रुग्णांलयातील कोविड-१९ च्या उपचार सुविधांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, धूत हॉस्पिटलचे प्रसाद पुंडे, डॉ. संजय सुर्वे, अॅपेक्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष कठाळे, एशियन हॉस्पिटलचे डॉ. शोएब हाश्मी, फिजिशियन डॉ. विशाल ठाकरे, जे.जे. प्लस हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील, कमलनयन बजाज हॉस्पिटलचे डॉ. अलोक श्रीवास्तव, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. अजय रोटे यांची उपस्थिती होती.
मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, सर्व खाजगी कोविड रुग्णालयांनी त्यांच्याकडील उपलब्ध खाटांबाबतची अद्ययावत आकडेवारी मनपा आरोग्य विभागाला कळवावी.