CoronaVirus In Aurangabad : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात पुन्हा परिचारिकांना दर्जाहीन पीपीई कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 07:31 PM2021-05-07T19:31:07+5:302021-05-07T19:34:11+5:30
CoronaVirus In Aurangabad : घाटीत सध्या तीन कंपन्यांच्या पीपीई कीटचा पुरवठा होतो. यात एका कंपनीने पुरविलेल्या पीपीई कीटच्या गुणवत्तेवर परिचारिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
औरंगाबाद : घाटीत गतवर्षी सॅम्पल पीपीई कीट देऊन कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा गुणवत्ता नसलेल्या आणि दर्जाहीन पीपीई कीट परिचारिकांना पुरविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सुपरस्पेशालिटी ब्लाॅकमध्ये (एसएसबी) कामावर जाण्यास नकार दिला. तब्बल ४५ मिनिटांनंतर अन्य पीपीई कीट मिळाल्यानंतरच सर्व जण कामावर रूजू झाल्या.
घाटीत सध्या तीन कंपन्यांच्या पीपीई कीटचा पुरवठा होतो. यात एका कंपनीने पुरविलेल्या पीपीई कीटच्या गुणवत्तेवर परिचारिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबद्दल वारंवार तक्रारी करूनही चांगले पीपीई कीट मिळत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी सुपरस्पेशालिटी ब्लाॅकमध्ये कर्तव्यावर जाण्यास नकार दिला. परिचारिका प्रवेशद्वारावर एकत्र जमल्या. नवीन पीपीई कीट मिळत नाही, तोपर्यंत कामावर रूजू होणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. याविषयी माहिती मिळताच प्रशासनाने पुरविलेले कीट परत घेत अन्य पीपीई कीट दिले.
तात्काळ पुरविले पीपीई
तक्रारीनुसार पुरविलेले पीपीई कीट काढून घेण्यात आले. परिचारिकांना अन्य पीपीई कीटचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर परिचारिका तत्काळ कामावर हजर झाल्या. संबंधित पीपीई कीटसंदर्भात पुढील प्रक्रिया प्रशासन करेल.
-डाॅ. सुधीर चाैधरी, विशेष कार्यअधिकारी, एसएसबी
पीपीई किटबद्दल काय तक्रार
- पीपीई कीट योग्य फिटिंगचे नाही.
- पीपीई किट घातल्यानंतर योग्य वाटत नाही.
-पीपीई किट लगेच फाटून जाते.
- पायातील किट गळून पडतात.
- किटला मागील बाजूने बंद दिला. बांधण्यास अडचणी.
- शरीराचा काही भाग उघडाच राहतो.