Coronavirus In Aurangabad : बजाजनगरच्या धर्तीवर जिल्ह्यात ९७ हॉटस्पॉटमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 07:35 PM2020-07-15T19:35:01+5:302020-07-15T19:37:17+5:30

बजाजनगरमध्ये आरोग्य विभागाकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३९६ शिक्षकांची १९६ पथके तैनात करून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.

Coronavirus In Aurangabad: Survey started in 97 hotspots in the district on the lines of Bajajnagar | Coronavirus In Aurangabad : बजाजनगरच्या धर्तीवर जिल्ह्यात ९७ हॉटस्पॉटमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात

Coronavirus In Aurangabad : बजाजनगरच्या धर्तीवर जिल्ह्यात ९७ हॉटस्पॉटमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देबजाजनगर परिसरात १८ जुलैपर्यंत सर्वेक्षण ग्रामीण भागात २५ जुलैपर्यंत होणार सर्वेक्षण

औरंगाबाद : जि.प.च्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर परिसरातील सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेतच नियंत्रणात येऊ शकला. बजाजनगरचा हाच पॅटर्न जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सुमारे ९७ हॉटस्पॉटच्या ठिकाणी वापरून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 

यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, वाळूज-बजाजनगर या औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. मात्र, तो नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३९६ शिक्षकांची १९६ पथके तैनात करून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. या पथकांमध्ये आरोग्य कर्मचारीही तैनात आहेत. 
ही पथके बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, वडगाव कोल्हाटी, वळदगाव या जवळपास सहा लाख लोकसंख्येच्या परिसरात ३० जूनपासून प्रत्यक्ष ‘डोअर टू डोअर’ जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. 

घरात कोणाला सर्दी, ताप, खोकला, घशात खवखवणे याची माहिती जाणून घेत आॅक्सिमीटरद्वारे कुटुंबातील ५० वर्षांवरील नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी, नाडीचे ठोके तपासले जात आहेत. या माध्यमातून सुरुवातीला प्राथमिक लक्षणे असलेले ७०-७० संशयित रुग्ण आढळून आले. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आले. आता अशा प्रकारचे रुग्ण आढळून येण्याची संख्या ७ पर्यंत खाली आली आहे. वेळीच संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला. त्यामुळे जिल्हाधिकारी उदय चौधरी व सीईओ डॉ. गोंदवले यांनी बजाजनगरचा हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असून, शंभर कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. औरंगाबाद, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. 

बजाजनगर परिसरात १८ जुलैपर्यंत सर्वेक्षण
शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी सांगितले की, बजाजनगर व लगतच्या औद्योगिक परिसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत शिक्षकांच्या माध्यमातून १८ जुलैपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. जिल्ह्यातील ९७ ‘हॉटस्पॉट’मध्ये हे काम २५ जुलैपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या या पद्धतीमध्ये पथकांच्या नियंत्रणासाठी माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख हे सुपरवायझर म्हणून, तर दहा सुपरवायझरच्या नियंत्रणासाठी एक शिक्षण विस्तार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे या सर्वेक्षणावर नियंत्रण करतील. 

Web Title: Coronavirus In Aurangabad: Survey started in 97 hotspots in the district on the lines of Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.