Coronavirus In Aurangabad : दूध वगळता शहरात राहणार कडक संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:01 PM2020-07-07T16:01:02+5:302020-07-07T16:04:42+5:30
कोणतीही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार नाही यादृष्टीने विचार विमर्श सुरू
औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी लावण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळामध्ये सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये नागरिकांना दूध उपलब्ध होईल. या शिवाय कोणतीही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार नाही यादृष्टीने विचार विमर्श सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. संचारबंदीच्या काळामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दोन शिफ्टमध्ये पोलिसांना सहकार्य करणार आहेत.
कोरोना आजाराची साखळी ब्रेक करण्यासाठी संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून पोलीस यंत्रणा दिवस-रात्र कोरोनाशी लढा देत आहेत. शहर पोलिसांना संचारबंदीत महापालिकेचे दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये मदत करणार आहेत. 20 पॉईंटवर लॉक डाऊन सहाय्यक, लॉकडाऊन सुपरवायझर, ५० ठिकाणी सेक्टर ऑफिसर यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी काही ऑब्झर्वर नेमण्यात येणार आहेत.
शहरातील किती आणि कोणत्या भागातील औषधी दुकाने सुरू ठेवायची यावर विचारविमर्श सुरू आहे. औषधी दुकाने काही तास सुरू ठेवावीत का यासंदर्भात ही विचार सुरू आहे. सरकारी पेट्रोल पंप वगळता शहरातील इतर पेट्रोल पंप संदर्भात पंप चालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांना इंधन मिळेल.