CoronaVirus In Aurangabad : 'हमका पीनी है, पीनी है'; दारू दुकाने,बारला सील ठोकल्याने तळीरामांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:59 AM2020-04-04T11:59:38+5:302020-04-04T12:06:03+5:30
दारू दुकाने आणि बार बंद असूनही दारू मिळत होती
- संजय जाधव
पैठण : 'हमका पीनी है, पीनी है' म्हणत दिवसभर
संचारबंदीत दारूच्या सर्चिंगमध्ये फिरत असलेल्या तळिरामांची तजवीज कुठे ना कुठे होत होती, यामुळे गेल्या दहा बारा दिवसात तळिरामांची ओरड वा संताप कुठे दिसून आला नाही. परंतु, आजपासून दारू उत्पादन शुल्क विभागाने शहरातील व तालुक्यातील सर्व देशी दारू, परमीट रूमला सील ठोकून गुपचूप दारू मिळण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. यामुळे तळिरामात अस्वस्थता पसरली आहे. यापुढील दिवस मात्र तळिरामांची कसोटी पाहणारे ठरणार आहे, यात शंका नाही.
आज जिल्हाभरातील सर्व देशी दारू व परमिट रूमला सील ठोकण्यात आले. सील तोडल्यास संबंधिताचा परवाना रद्द करण्याचा ईशारा दारूबंदी निरीक्षक शरद फटांगडे यांनी दिला आहे. पैठण शहरातील १६ परमिट रूम व सहा देशीदारू दुकानांना आज सील ठोकण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचाऱ्याकडून आज दिवसभर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसापासून देशीदारू व परमीट रूम बंद.होते. मात्र, तळिरामांना दारूचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या यामुळे या दुकानास सील लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निरीक्षक शरद फटांगडे यांनी सांगितले. दरम्यान पैठण तालुक्यात दारूची दुकाने बंद असताना तळिरामांना मद्य उपलब्ध होत होते, या बाबत तळिरामाची तक्रारही नव्हती. एका जणाने तर मद्याची घरपोच सेवा सुरू केली होती.
पैठण शहरातून तालुक्यातील ग्रामीण भागात भल्या पहाटे दारूचा पुरवठा होत होता. संचारबंदीतही सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. पण अचानक उत्पादन शुल्क विभागाने आज दुकानांना सील ठोकल्याने तळिरामाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दारू नसेल तर मी जगू देणार नाही
दारूसाठी तळिराम काय करतील याचा नेम नाही, पैठण येथील एका तळिरामाने चक्क दारूसाठी शहरातील डॉक्टरकडे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. दारू पिली नाहीतर मी जगू शकणार नाही असे प्रमाणपत्र तो डॉक्टर कडे मागत होता. तळिरामाची मागणी ऐकून डॉक्टरांनी डोक्यावर हात मारून घेतला. तळिरामाने पुढे आग्रह रेटल्यावर डॉक्टरने दारू सोडण्याचे इंजेक्शन देऊ का असे विचारताच तळीरामाने दोन्ही हात झटकून दवाखान्यातून काढता पाय घेतला.