coronavirus : औरंगाबादकरांनो धोका कायम, गाफील राहू नका; १२ टक्के नागरिकांना होऊन गेला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 03:28 PM2020-08-25T15:28:46+5:302020-08-25T15:35:12+5:30
१५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत सध्या अँटीबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे अजून शहर कोरोनाच्या विळख्यातच आहे.
औरंगाबाद : शहरातील १२ टक्के म्हणजेच १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली. या नागरिकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे सेरो सर्वेक्षणाच्या विश्लेषणांती समोर आले आहे.
१५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत सध्या अँटीबॉडीज विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे अजून शहर कोरोनाच्या विळख्यातच आहे. नागरिकांनी गाफील राहू नये. लॉकडाऊन करून यावर मात करणे शक्य नसून मास्क, सुरक्षित वावर, वारंवार हात धुण्याचे आवाहन सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबादकरांना केले.
दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेत १०-१५ ऑगस्ट या काळात केलेल्या सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष सोमवारी जाहीर करण्यात आले. ११५ वॉर्डांत ४३२७ रक्तनमुने अँटीबॉडीज तपासणीसाठी संकलित केले होते. त्यात प्रत्येक १० घरांमागे एकाचा समावेश होता. १०-१७ वयोगटातील मुलांचा ३० क्लस्टरमध्ये अभ्यास करण्यात आला. १२ टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, म्हणजे अजून खूप काळजीने वागावे लागणार आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सेरो सर्व्हेतील विश्लेषणाची शास्त्रीय कारणे स्पष्ट केली. यावेळी डॉ. शोभा साबळे यांची उपस्थिती होती.
#coronavirus#Aurangabad यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे.https://t.co/E7VERQ2XI6
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
या वसाहतींत सर्वाधिक अँटीबॉडीज
सिल्लेखाना-नूतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, जुना बाजार, न्यायनगर, संजयनगर या पाच वॉर्डांमध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ६३.३ टक्के, ५४.५, ५० टक्के, ४३.६ टक्के, ३९.४ टक्के कोरोनाविरोधी अँटीबॉडीज आढळून आल्या.
0 % अँटीबॉडीज हायप्रोफाईल वसाहतींत
जय विश्वभारती कॉलनी, विश्वासनगर, जवाहर कॉलनी-शास्त्रीनगर, संत ज्ञानेश्वरनगर, जटवाडा रोड या पाच वॉर्डांमध्ये घेतलेल्या तपासणी नमुन्यात शून्य टक्के अँटीबॉडीज आढळल्या. त्यामुळे या व सारख्या इतर वसाहतींमध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
८१ % लोकांचा संपर्कच आला नाही
सेरो सर्वेक्षण करताना अँटीबॉडीज आढळून आलेल्या १२ टक्क्यांपैकी ८१ टक्के लोकांचा कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्कच आलेला नाही. १२ टक्के लोकांना याबाबत काही माहितीच नव्हती, तर ७ टक्के लोकांनी थेट संपर्क न आल्याचे सांगितले.
पॉझिटिव्ह आलेल्या २२ जणांत अँटीबॉडीज
५६ जणांची स्वॅब तपासणी पॉझिटिव्ह आढळली होती. त्यातील २२ लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. निगेटिव्ह स्वॅब आढळून आलेल्या १६.६६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या, तर लहान मुलांमध्ये ८.६ टक्के जणांत कोरोनाविरोधी अँटीबॉडीज आढळल्या आहेत.
सर्वेक्षणातील ४,३२७ नागरिकांत १० ते १७ वयोगटातील २१० मुले आहेत
११५ वॉर्डांतून प्रत्येकी ३० ते ४० नमुने संकलित करण्यात आले. प्रत्येक वॉर्डात दोन डॉक्टर, एक तंत्रज्ञ असे तिघांचे पथक होते. १० घराआड एक घर नमुने संकलनासाठी निवडले. स्त्री-पुरुष आणि विविध वयोगटांमध्ये कोविडविरोधात प्रतिकारशक्ती जवळपास सारख्याच प्रमाणात आढळली.
आकडेवारीत निष्कर्ष
- औरंगाबाद शहरात ११.८२ % लोकांमध्ये कोरोना विरोधात प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) आढळली.
- झोपडपट्टीतील लोकसंख्येत १४.५६ % प्रमाण आहे
- इतर वसाहतींमध्ये १०.६४ % टक्के आहे.
- १.७० लाख जणांत प्रतिकारशक्ती
सध्या ४३८० जणांवर उपचार सुरू आहेत https://t.co/9erZpx0V9y
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020