Coronavirus : औरंगाबादकरांना मोठा धक्का ! तब्बल ६१ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या सहाशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:57 PM2020-05-11T12:57:44+5:302020-05-11T13:04:14+5:30
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५० रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
रामनगर 22, एस आरपीएफ जवान १, सदानंदनगर 8, किलेअर्क ८, न्यायनगर २, दत्त नगर कैलास नगर ५ , भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1 , एन 4 सिडको, बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव येथील प्रत्येकी एक फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश असल्याचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले
चार दिवसात २४१ रुग्णांची भर
शहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी ५० , सोमवारी सकाळी ६१ अशा तब्बल २४१ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
शहरात कोरोनाचा १४ वा बळी
औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रामनगर- मुकुंदवाडी येथील ८० वर्षीय रुग्णाचा रात्री १.१० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. सदर रुग्णावर घाटीत ८ मे पासून उपचार सुरू होते. ९ मे रोजी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने १० मे पासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील हा कोरोनाचा १४ मृत्यु आहे.
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वर
औरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी आणखी २७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यातील आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर मनपाच्या केंद्रात दाखल १९ जणही कोरोनामुक्त झाले. यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९२ वर गेली आहे.