CoronaVirus : खबरदारी ! पैठणच्या शशी विहार वसाहतीतील ११० रहिवाशी होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:28 PM2020-04-07T18:28:53+5:302020-04-07T18:31:28+5:30
जंतूनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून परिसर सील करण्यात आला आहे.
पैठण : पैठण शहरातील शशी विहार वसाहती मधील जवळपास ११० रहिवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून जंतूनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी करून परिसर सील करण्यात आला आहे.
घाटी रूग्णालय औरंगाबाद येथील कोरोनाची लागण झालेला ब्रदर शशी विहार परिसरातील नातेवाईकांकडे येऊन गेल्याची माहीती समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून आज ही कार्यवाही केली. दरम्यान, कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या वसाहतीतील सहा नागरिकांचे कोरोना टेस्टसाठी स्वँब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
औरंगाबाद शासकीय रूग्णालय ( घाटी) येथे काम करत असलेल्या एका ब्रदरला कोरोनाची लागन झाल्याचे रविवारी समोर आले होते. दरम्यान हा ब्रदर पाटेगाव ता पैठण येथील मुळ रहिवाशी असून त्याची सासरवाडी पैठण शहरातील शशी विहार भागात असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा रविवार पासून सतर्क झाल्या आहेत. सोमवारी रात्री या ब्रदरचे नातेवाईक असलेल्या सहा जणांना कोरोनाची तपासणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हलवले . बुधवार पर्यंत या सहा जणांच्या कोरोना टेस्टचा अहवाल अपेक्षित आहे. अहवाल काय येतो या शंकेने परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय रूग्णालयातील डॉ संदिप रगडे, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, आरोग्य पथकातील कर्मचारी, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व त्यांचे पथक आदिंनी शशी विहार वसाहतीतील नागरिकांना कोरोना संदर्भात माहिती देऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. पुढील १५ दिवस या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
नगर परिषदेच्या वतीने आज शशीविहार भागात मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, प्रभारी नगराध्यक्ष सुचित्रा महेश जोशी , स्वच्छता सभापती भूषण कावसानकर, नगरसेवक ईश्वर दगडे, स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, व्यंकटी पापूलवार, आदीच्या पथकाने अग्निशमन गाडीच्या फवाऱ्या द्वारे जंतूनाशक फवारणी करून परिसर निर्जंतुक केला. दरम्यान, शशी विहार परिसर आज सकाळी पोलिसांनी सील केला असून या भागात कायम स्वरूपी गस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. तहसील प्रशासनानेही या भागात एक बैठे पथक नियुक्त केले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर हे पथक लक्ष ठेवून प्रशासनास माहिती देणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. दरम्यान,परिसरातून चाचणीसाठी नेलेल्या सहा रहिवाशांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह यावा म्हणून या भागातील नागरिकासह पैठणकर देव पाण्यात ठेवून बसले आहेत.