coronavirus : सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात झाली साफसफाई; लवकरच होणार औषधी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:21 PM2020-03-20T18:21:26+5:302020-03-20T18:21:57+5:30
राज्यमंत्री, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी दिली अचानक भेट...
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा, घाणीचे साम्राज्य याबाबत लोकमत ने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयाची साफ सफाई केली. उपजिल्हा रुग्णालयात सर्वत्र मेडिकल असोसिएशन व रुग्ण कल्याण समिती, नगर परिषद मार्फत जंतू नाशकाची फवारणी करण्यात आली. आरोग्य विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देऊन तुटवडा असलेली औषध पुरवठा लवकरच केला जाईल याबाबत आरोग्य विभागाने मागणी करावी अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अचानक उपजिल्हा रुग्णालयाला शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील उपाय योजनेचा आढावा घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाणीचे साम्राज्य बघून काम चुकार कर्मचाऱ्यांना खडसावले. सर्वत्र साफ सफाई करण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर शुक्रवार ( दि. 20 ) रोजी ना. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेतला . तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, अब्दुल समीर अब्दुल सत्तार, नगराध्यक्षा राजश्री निकम, वैद्यकीय अधीक्षक हर्षल सरदेसाई, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे आदींची उपस्थिती होती.
प्रशासन सज्ज, 100 बेडची व्यवस्था.....
खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात 20 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून शहरातील 20 खाजगी रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड याप्रमाणे शंभर बेडची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात पन्नास बेडचे आयसोलेशन वॉर्ड व ग्रामीण रुग्णालयात 15 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण कोरोना पासून सुरक्षित राहू असे ना. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.