coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या औरंगाबाद येथील महिलेची प्रकृती स्थिर; अफवांवर विश्वास ठेवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:31 PM2020-03-17T12:31:24+5:302020-03-17T12:46:18+5:30
अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शासकीय यंत्रणेने केले आहे.
औरंगाबाद : शहरात कोरोनाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शहरात अफवा पसरवल्या जात असून यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन शासकीय यंत्रणेने केले आहे.
खाजगी रुग्णालयात दाखल ही महिला शहरातील एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहे. शहरातून दि.२३ फेब्रुवारी रोजी त्या रशिया, कझाकिस्तान येथे गेल्या. तेथून त्या दि.३ मार्चला शहरात परतल्या. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्या दि.१३ मार्च रोजी खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांची लक्षणे आणि प्रवासाच्या माहितीवरून कोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाने नोंद घेऊन त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. यानंतर त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत शहरात अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेने केले आहे.
‘एआरटी’ उपचार सुरू
या महिलेवर १० खाटांच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. हा वॉर्ड रुग्णालयातील इतर वॉर्डांपासून दूर आहे. या महिलेवर अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) उपचार करण्यात येत आहे. यात तीन प्रकारची औषधी, मलेरियाचे औषधोपचार सुरू आहेत. उपचाराच्या ४ दिवसांनी महिलेचा ‘स्वॅब’ पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.