CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह जवान हिरापूर येथे होता मुक्कामी; प्रशासनाकडून गाव सील, ६ क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:16 PM2020-05-02T18:16:30+5:302020-05-02T18:22:52+5:30
मालेगाव नाशिक येथून बंदोबस्तातुन परतलेला जवान हिरापुर ता.औरंगाबाद येथे सहा दिवस वास्तव्यास होता.
करमाड : एसआरपीएफचा कोरोना पॉझिटिव्ह जवान हिरापूर (ता.औरंगाबाद) येथे ६ दिवस राहील्याचे समजताच वरूडकाजी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. यानंतर हिरापूर गाव प्रशासनाने सील केले असून जवानाच्या कुटुंबातील सहा जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
मालेगाव नाशिक येथून बंदोबस्तातुन परतलेला जवान हिरापुर ता.औरंगाबाद येथे सहा दिवस वास्तव्यास होता. याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांच्या वतीने तात्काळ गावात संचार बंदी लागू करण्यात आली व कुटुंबातील सदस्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
वरुडकाजी जवळील हिरापूर ता.औरंगाबाद येथील एक SRPF चा जवान जालना येथे कार्यरत असून तो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेलेला होता. कर्तव्यावरून सुट्टी घेऊन तो २० एप्रिल रोजी आपल्या पत्नी व २ मुलांसह दुचाकीवर हिरापूर येथे आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. सहा दिवस हिरापूर येथे राहिल्यानंतर २६ तारखेला तो जवान पत्नी व मुलांना घेऊन जालना येथे कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेला. ३० तारखेला या जवानाचा कोरोना चाचणी घेण्यात आली व २ मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नी. महेश आंधळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत हिरापूर येथे दाखल झाले व तात्काळ गाव सील करण्यात आले.
या जवानाच्या परिवारातील आई वडील, भाऊ, भाऊजाई, भावाची २ मुले यांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आले असून. जवानांच्या संपर्कात अलेल्या इतरांचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेमुळे वरुड काजी, शेंद्रा गाव व एमआयडीसी, कुंभफळ, गंगापूर - जहागीर, महालपिंप्री, कच्छीघाटी, वडखा, वरझडी , गोपाळपूर अशा 10 ते 12 गावात प्रचंड दहशत पसरली आहे.