पाच महिन्यांपासून 'ब्रेक' लागलेले ‘कोरोन टास्क फोर्स’ पुन्हा मैदानात; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:24 PM2021-02-19T17:24:56+5:302021-02-19T17:25:12+5:30
coronavirus in Aurangabad : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली.
औरंगाबाद : रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाच महिन्यांपासून ‘ब्रेक’ लागलेल्या ‘कोरोना टास्क फोर्स’ची बैठक घेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्वांना कामाला लावले आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, भाजी मंडई, मॉल, आठवडी बाजार, बसस्टँड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी विशेष लक्ष द्या. सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करा. विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले. सर्व यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेऊन कोरोनाबाबत स्थापन केलेल्या सर्व समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचेही त्यांनी सुचविले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी ‘कोविड-१९ टास्क फोर्सची’ बैठक पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त पराग सोमण, जगदीश मणीयार, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ.सुधाकर शेळके, आदींसह खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.
महापालिकेने काय करावे?
महापालिकेने विना मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. कोविड केअर सेंटर, औषधांचा नियमित आढावा घ्यावा. बसस्टँड, रेल्वे स्टेशन येथे तपासणी केंद्र सुरूच ठेवावेत, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, कोविड लसीकरण मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.
जिल्हा परिषदेने काय करावे?
जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष द्यावे, ग्रामीण रुग्णालये सुसज्ज ठेवावेत तसेच मास्क वापरणे बंधनकारक करावे.
जिल्हा प्रशासनाने हा प्रयत्न करावा
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार पोलिसांनी नियमित बैठका घेऊन समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियंत्रणाची नियमावली बंधनकारक करावी. जिल्हा प्रशासनाने नियमितपण टास्क फोर्सच्या बैठका घ्याव्यात.
एस. टी. महामंडळाला सूचना अशा
एस.टी. बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा तसेच बसस्थानकाच्या परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करावी. लाऊडस्पीकरद्वारे वेळोवेळी सूचना कराव्यात.
आरटीओवरही जबाबदारी
ऑटो रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणाऱ्यांवर आरटीओंनी कारवाई करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे.
घाटी व आरोग्य विभागासाठी या सूचना
घाटीने बेड सज्ज ठेवावेत. औषधी, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खासगी रुग्णालयांनी कोविड व नॉन कोविड असे भाग करुन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड ठेवावेत तसेच ऑक्सिजन निर्मिती युनिट बसवावे. अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांनी तत्काळ लस घ्यावी तसेच फ्रंटलाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनीही लस घ्यावी.