coronavirus: औरंगाबादेत कोरोनाची तपासणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:16 AM2020-03-29T03:16:47+5:302020-03-29T03:17:17+5:30
कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’कडून शनिवारी घाटीला कीट प्राप्त झाल्या.
औरंगाबाद : घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र कार्यान्वित झाले असून, आता औरंगाबादेतच कोरोनाची बहुप्रतीक्षित तपासणी अखेर शनिवारपासून सुरू झाली आहे. तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) मंजुरी मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुपारी २ वाजता संशयित रुग्णाचा पहिला स्वॅब तपासणीसाठी घाटीकडे रवाना झाला.
कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी पुणे येथील ‘एनआयव्ही’कडून शनिवारी घाटीला कीट प्राप्त झाल्या. क्वालिटी कंट्रोलची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ‘एनआयव्ही’ने तपासणीसाठी मंजुरी दिली. घाटीत तपासणी होणार असून, स्वॅब पाठविण्याचे जिल्हा रुग्णालयाला सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री दाखल झालेला संशयित आणि खाजगी रुग्णालयातील एक संशयित, असे दोघांचे स्वॅब घाटीकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मा बकाल, डॉ. मनोहर वाकळे आदींची उपस्थिती होती. घाटी रुग्णालयाला व्हीआरडीएल लॅबसाठी आॅक्टोबर २०१९ ला मंजूर मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात ही प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
यासंदर्भात ‘घाटीतील व्हीआरडीएल लॅब कागदावरच’ या मथळ्याखाली १८ मार्च रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ही प्रयोगशाळा उभारणीला गती देण्यात आली. या लॅबसाठी महत्त्वपूर्ण असे यंत्र २३ मार्च रोजी दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रयोगशाळेची नुसती प्रतीक्षाच करावी लागत होती.
परिणामी, स्वाईन फ्लू आणि सध्या धुमाकूळ घालणाºया कोरोनाच्या निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’वरच भिस्त होती. त्यामुळे निदानासाठी वाट पाहण्याची वेळ रुग्णांवर ओढावत होती. मात्र, चाचणी सुरू झाल्याने विषाणूजन्य आजारांचे अहवाल लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल. यंत्र कार्यान्वित करण्यासाठी आरोग्य विभाग, घाटी प्रशासन, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती बजाज-इरावणे आदींनी परिश्रम घेतले. या तपासणी सुविधेमुळे संपूर्ण मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे.
पहिली चाचणी घेतली
घाटीतील टीबी लॅबमध्ये यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी यंत्र कार्यान्वित झाले आहे. ‘एनआयव्ही’ची परवानगी मिळाली असून, पहिली तपासणीही झाली.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)