coronavirus : युद्धात तोफेच्या तोंडी असलो तरी ‘चिंता नको आमची’ शूर योद्धे आम्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 07:10 PM2020-07-28T19:10:23+5:302020-07-28T19:13:32+5:30
कोरोनामुक्तीसाठी लढणाऱ्या डॉक्टरांशी संवाद
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : आई-बाबा मुळीच घाबरू नका, वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवा करणे हाच खरा उद्देश आहे. युद्धात तोफेच्या तोंडी असलो तरी ‘चिंता नको आमची’ कोरोना झीरो मिशन औरंगाबादच्या फौजेतील शूर योद्धे आहोत आम्ही, असा संवाद साधत पालकांची समजूत काढून कर्तव्यावर सतत तत्पर टीम दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग अत्यंत घातक आहे, तुम्ही जाऊ नका असा माता-पित्यांचा व नातेवाईकांचा सततचा सल्ला; परंतु त्यांना एकच प्रश्न केला की, युद्धात सैनिकांनी घरी बसून नुसत्या भाकरी खायच्या काय. आरोग्य सेवेला प्राधान्य असून, त्यासाठी आम्ही सदैव तयारीत आहोत. सर्व साधनांचा पुरवठा मनपा आरोग्य विभागाने केला असल्याने मग कशाची भीती, असा प्रतिसवाल त्यांनी केला. पूर्वीच्या तुलनेत अँटिजन टेस्टमुळे तात्काळ निदान होत असून, दक्षतादेखील अधिक प्रमाणात घेतली जात आहे.
मास्क, फेस मास्क, हँडग्लोज, अत्यंत दर्जेदार पीपीई कीटमुळे सुरक्षितपणे वैद्यकीय सेवा देत असून, औरंगाबादेत इतरही वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना असलेली भीती आता कमी झाली असून, नाक व घशातून घेतला जाणारा स्वॅब टेक्निशियनकडे दिला जातो. काही समज-गैरसमजामुळे अनेक जण घाबरतात; परंतु आता नागरिक स्वत:हून स्वॅब देण्यासाठी येत आहेत. दंत वैद्यकियांच्या टीममधील डॉ. मधुरा चिखले या नागपूर, डॉ. रोशनी डहाके या यवतमाळ, डॉ. मोनिका सुरवसे, डॉ. शीतल झाडे, डॉ. कोमल दीपके या औरंगाबादेतील योद्ध्या असून, इतरही योद्ध्यांसह त्या मोठ्या हिमतीने स्वॅब घेत आहेत.
आई-बाबा चिंता नको...
औरंगाबादेतील अँटिजन टेस्टसाठी तयार केलेली फौजही अत्यंत मेहनती असून, आई-बाबा तुम्ही घाबरू नका, प्रशासनदेखील काळजीपूर्वक लक्ष देत आहे. हे युद्ध आम्ही जिंकणार, मागे नाही हटणार, अशी हिंमत दररोज देत आहोत.
- डॉ. मधुरा चिखले
खबरदारीपूर्वक स्वॅब घेत आहोत
यवतमाळहून रुग्णसेवेसाठी औरंगाबादला आले असून, आई-बाबा शिक्षक आहेत. त्यांना खूप चिंता होती; परंतु रुग्णसेवेत आता कसलीही भीती वाटत नाही. तोफेच्या तोंडी असलो तरी खबरदारीपूर्वक स्वॅब घेत आहोत. स्वत:ची इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रयत्न आहे.
- डॉ. रोशनी डहाके
घर स्वतंत्र अलगीकरण
कर्तव्यावरून घरी गेल्यानंतर स्वतंत्र खोलीत स्वत:ला अलगीकरण करून घेत आहोत. कुटुंबाचा संवाद फोनवर किंवा दुरूनच होत आहे. आपल्यामुळे कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी बाळगत आहोत. काम जिकरीचे असले तरी ते टाळणे शक्य नाही. ज्या उद्देशाने वैद्यकीय सेवा पत्करली आहे. हिमतीने संघर्ष करण्याचा हाच तो क्षण आहे. घरच्यांनाही माझ्या कामावर गर्व वाटतो आहे.
- डॉ. मोनिका सुरवसे