coronavirus : कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता
By सुमेध उघडे | Published: May 9, 2020 01:54 PM2020-05-09T13:54:06+5:302020-05-09T13:59:50+5:30
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
- सुमेध उघडे
औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीला नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची शिथिलता हे कारण असल्याचे मत औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने आॅनलाईन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणाला शहरवासीयांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या ४९५ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या आधी आढळलेल्या भागांसह शहरातील नवनव्या भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आॅनलाईन सर्वेक्षण केले. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे कारण काय असावे, या पहिल्या प्रश्नावर तब्बल ५३.८ टक्के उत्तरदात्या नागरिकांनी शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढीमागे प्रशासनाची शिथिलता आणि नागरिकांची बेफिकिरी असे दोन्ही कारणीभूत असल्याचे मत नोंदविले आहे. तर ३८ टक्के नागरिकांना यामागे प्रशासनाची शिथिलता असून, केवळ ८.२ टक्के उत्तरदात्यांना नागरिकांची बेफिकिरी यास कारणीभूत असल्याचे वाटते.
दुसऱ्या प्रश्नात, जिल्हाधिकारी, महापालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी समन्वय आहे असे वाटते का, या प्रश्नावर ४६.२ टक्के नागरिकांनी या सर्व यंत्रणेच्या कामावर समाधान व्यक्त करून समन्वय आहे असे म्हटले आहे. मात्र, ३९.८ टक्के उत्तरदात्यांना यांच्यात समन्वय नाही, असे वाटत असून १४ टक्के नागरिकांनी माहिती नाही असे मत नोंदविले.
औरंगाबादमध्ये लॉकडाऊन काळात सम- विषम तारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू-बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का, या प्रश्नावर ५७.३ टक्के नागरिकांनी निर्णय योग्य असल्याचा कौल दिला आहे. तर ३८.९ टक्के नागरिकांना हा निर्णय योग्य नसल्याचे वाटत असून, ३.८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले आहे.
लॉकडाऊन १७ मेनंतर वाढवा
रेड झोनमध्ये आलेल्या औरंगाबादचा लॉकडाऊन कालावधी १७ मेनंतरही वाढवायला हवा का? या प्रश्नावर तब्बल ७४.७ टक्के नागरिकांनी सकारात्मकता दर्शवून होय म्हटले आहे, तर केवळ १३.१ टक्के नागरिकांनी लॉकडाऊन कालावधी वाढवू नये, असे वाटत असून १२.३ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत नोंदविले.