coronavirus : ‘पॉझिटिव्हिटी’च्या बळावर कोरोनाबाधितांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:31 PM2020-07-25T19:31:39+5:302020-07-25T19:32:48+5:30
महापालिकेच्या यंत्रणेचे श्रम आणि रुग्ण पॉझिटिव्हिटीच्या बळावर बरे होऊन घरी जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी काही तास व्यतीत केले, त्याचा हा वृत्तांत.
औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह म्हणताच चांगल्या चांगल्यांना घाम फुटत आहे. ज्यांना कोरोना झाला म्हटले त्यांच्या पायाखालची वाळू क्षणभर सरकते. कुटुंबियांच्या डोळ्यातून निव्वळ अश्रू वाहत असतात. चिमुकल्यापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष महापालिकेच्या चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. महापालिकेच्या यंत्रणेचे श्रम आणि रुग्ण पॉझिटिव्हिटीच्या बळावर बरे होऊन घरी जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी काही तास व्यतीत केले, त्याचा हा वृत्तांत.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागताच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चिकलठाणा एमआयडीसी येथे महापालिकेसाठी २५० खाटांचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल अवघ्या एक महिन्यात उभारून दिले. तीन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रुग्णालयात सध्या २८९ स्त्री-पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६७ आहे. शुक्रवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा पॉझिटिव्ह रुग्णांसोबत संवाद घडवून आणला. सर्वांना पीपीई कीट घालून पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डात नेण्यात आले. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड रुग्णालयात दहा दिवस उपचार घ्यावे लागतात. ज्यांना जास्त दिवस रुग्णालयात झाले आहेत ते नवीन रुग्णांना मार्गदर्शन करतात. त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रुग्णांनी महापालिकेच्या सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. डॉक्टर आणि कर्मचारी खूप काळजी घेतात आणि जेवणाची गुणवत्ता चांगली असल्याची पावती रुग्णांनी दिली. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या जवळपास ९० टक्के आहे.
१२ तास पीपीई कीट घालणे अशक्य
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये बारा तास पीपीई कीट घालून काम करणे अशक्य आहे. एक तास कीट घातल्यानंतर प्रत्येकाला श्वास घ्यायला त्रास आणि प्रचंड घाम येतो. अशा परिस्थितीत कर्मचारी आणि डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत.
एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त नाही
२२ जूनपासून महापालिकेने पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर सुरू केले. मागील एक महिन्यात रुग्णालयात काम करणारा एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला नाही. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले सात ते आठ तरुण स्वयंसेवक म्हणून रुग्णालयात काम करण्यास तयार आहेत. लवकरच त्यांना स्वयंसेवक म्हणून रुग्णालयात काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.