coronavirus: कोरोना रुग्णांच्या भोजनावरील खर्चाला वाढीव दराची फोडणी!, मनपा आणि जिल्हा रुग्णालयात १०० रु. चा फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 06:27 AM2020-07-09T06:27:49+5:302020-07-09T06:29:07+5:30
औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रति व्यक्ती ११० रुपये असताना महापालिकेत २१० रुपये तर ग्रामीण भागातील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. खर्चात एवढा फरक का आहे, यावर एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाबाधितांना देण्यात येणारा आहार आणि त्यावरील खर्चात फरक असल्याचे ‘लोकमत’च्या तपासणीत उघड झाले आहे. औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रति व्यक्ती ११० रुपये असताना महापालिकेत २१० रुपये तर ग्रामीण भागातील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. खर्चात एवढा फरक का आहे, यावर एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. घाटीत स्वयंपाकगृहात रुग्णांसाठी जेवण तयार केले जाते, तर जिल्हा रुग्णालयात कंत्राटदारामार्फत रुग्णालयातच जेवण तयार करून रुग्णांना दिले जाते. ग्रामीण भागांत कंत्राटदाराच्या माध्यमातून नाश्ता, जेवण दिले जाते.
असा आहे दरातील फरक
जिल्हा रुग्णालयात रोज नाश्ता, जेवणापोटी प्रति व्यक्ती
"110
दर आहे; परंतु वाढीव आहारानुसार दर वाढविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी सांगितले.
मनपा केंद्रात
प्रति व्यक्ती
प्रतिदिन हा खर्च
"210
आहे, असे मनपातर्फे सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील केंद्रात प्रति व्यक्ती
"213
खर्च होत असल्याचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले.
तर घाटीत
प्रति व्यक्ती
"70
खर्च होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील आहार
१) सकाळी नाश्ता- चहा, अंडी आणि उपमा, पोहे, उसळ यापैकी आलटून-पालटून एक पदार्थ.
२) दुपारचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी.
३) दुपारी ४ वाजता- चहा.
४) रात्रीचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी.
मनपा केंद्र
१) सकाळी नाश्ता- चहा आणि उपमा, पोहे, शिरा यापैकी आलटून-पालटून एक पदार्थ. लहान मुलांना दूध, बिस्कीट. २) दुपारचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी, लोणचे. ३) सायंकाळी- चहा, बिस्कीट. ४) रात्रीचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी, लोणचे, गोड पदार्थ.
ग्रामीण भाग
१) सकाळी नाश्ता- चहा आणि उपमा, पोहे यापैकी एक पदार्थ. लहान मुलांना दूध-बिस्कीट. २) दुपारचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी. ३) दुपारी ४ वाजता- चहा, बिस्कीट. ४) रात्रीचे जेवण- वरण, भात, भाजी, पोळी.