coronavirus : डॉक्टरनेच पसरवली कोरोना झाल्याची अफवा; अमेरिकेतून परतलेल्या दाम्पत्याने केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:52 PM2020-03-20T17:52:09+5:302020-03-20T17:53:28+5:30
दाम्पत्याने शासकीय रूग्णालयात नियमानुसार तपासणी केली असून तपासणीचे शासकीय रुग्णालयाचे प्रमाण पत्र घेतलेले आहे.
पैठण : दोन महिन्यापूर्वी अमेरिकेतील मुलाला भेटून पैठण येथे परतलेल्या एका दाम्पत्यास कोरोनाची लागण झाली असल्या बाबत खोटा प्रचार करणाऱ्या पैठण शहरातील एका डॉक्टरच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याने शासकीय रूग्णालयात नियमानुसार तपासणी केली असून तपासणीचे शासकीय रुग्णालयाचे प्रमाण पत्र घेतलेले आहे. प्रमाणपत्रात त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. डॉ. अनिल सासणे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून कोरोना बाबतीत अफवा पसरविणाऱ्यांना यामुळे चाप बसला आहे.
शहरात भवानीनगर भागात राहणारे दाम्पत्य त्यांच्या मुलास अमेरिका येथे भेटण्यासाठी गेले होते ; दरम्यान हे दाम्पत्य दि ७ जानेवारी, २०२० रोजी पैठण येथे परतले . परदेश वारी करून आलेल्या नागरिकांच्या तपासणी अंतर्गत १८ मार्च २०२० रोजी त्यांची स्क्रीनिंग तपासणी वैद्यकीय अधिकारी पैठण यांनी केली. तपासणी दरम्यान त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रूग्णालयाने दिले आहे.दरम्यान भवानीनगर भागातील एका खाजगी डॉक्टरने या दाम्पत्याच्या नातेवाईकांना फोन करून पती- पत्नीस कोरोना झाला आहे व त्यांना औरंगाबाद येथे उचलून घेऊन गेले आहेत असे सांगून त्यांची समाजात बदनामी केली.
या बाबत या दाम्पत्यास समजताच त्यांना धक्का बसला. शुक्रवारी दुपारी या दाम्पत्याने पैठण पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादिवरून डॉक्टर विरोधात भादवी ५०० नुसार पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साहेबराव गिरासे करित आहेत.