coronavirus : कोरोना लढ्यासाठी ‘सीएसआर’ मिळेना; बड्या उद्योगांची चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 07:54 PM2020-07-29T19:54:27+5:302020-07-29T19:57:21+5:30
कोरोनाने औरंगाबाद शहराला विळखा घातला असून, औद्योगिक वसाहतीतील बड्या उद्योगांकडून सीएसआरमधून फार मोठी अशी मदत झालेली नाही.
औरंगाबाद : कोरोनाविरोधात लढाईसाठी जिल्ह्यातील उद्योगवर्तुळाने आजवर १० कोटींचाही पल्ला गाठलेला नाही. काही बोटावर मोजण्याइतक्याच उद्योगांनी आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बड्या उद्योगांनी चालढकल चालविली असून, ५ मे पासून त्यांना पत्रव्यवहार करूनही प्रशासनाच्या हाती काही पडलेले नसल्याने सीएसआरचा टक्का अद्याप वाढलेला नाही.
जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये ४ हजारांहून अधिक उद्योगांची संख्या असून, यामध्ये सुमारे २०० बडे उद्योग असे असतील ज्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे; परंतु काही उद्योगांनी कॉर्पाेरेट आॅफिस जिथे आहे, तेथे सीएसआरमधून मदत करण्याचा प्रकार सुरू आहे. शेंर्द्यातील एका बड्या उद्योग समूहाने तर पुण्यात सुमारे ११५० खाटांचे कोविड हॉस्पिटल सीएसआरमधून उभारल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती.
कोरोनाने औरंगाबाद शहराला विळखा घातला असून, औद्योगिक वसाहतीतील बड्या उद्योगांकडून सीएसआरमधून फार मोठी अशी मदत झालेली नाही. कॉर्पाेरेट आॅफिस ज्या ठिकाणी तेथे काही बड्या उद्योगांनी मदत केली आहे, तर काहींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे. औरंगाबादमधील उद्योगवर्तुळातून कररूपाने मोठे उत्पन्न केंद्र आणि राज्य शासनाच्या तिजोरीत जात असेल, परंतु सीएसआररूपाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदत येथील प्रशासनाला करणे अपेक्षित आहे.
सीएसआरमधून आरोग्यसेवेला बळकटी
जिल्ह्यातील उद्योगांनी सीएसआरमधून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) शहर व जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी मिळाल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला. सीएसआरमधून व्हेंटिलेटर मिळाले, आॅक्सिजन कॉन्सिलेटर मिळाले. निर्जंतुकीकरण करण्यासाठी मनपाने एकही पैसा खर्च केलेला नाही. स्टरलाईट कंपनीने त्यासाठी मदत केली असून, निर्जंतुकीकरणाचा सर्व खर्च सध्या स्टरलाईट करीत आहे. १२५ आॅक्सिजन कॉन्सिलेटर, २० व्हेंटिलेटर स्टरलाईट कंपनीने दिले. विप्रोने ९ पोर्टेबल एक्सरे मशीन दिले. विद्यापीठातील लॅबला आॅरिक सिटीने सव्वाकोटी रुपयांची मदत केली. स्टरलाईटने निर्जंतुकीकरणासाठी पूर्ण जिल्हा दत्तक घेतला आहे. बजाज कंपनीने अद्याप काहीही दिले नाही; परंतु त्यांचे सात ते आठ कोटी रुपयांचे नियोजन आहे. सर्व कोविड सेंटर अपडेट करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. घाटीतील मशिनरी अपडेट करण्यासाठी बजाजला सांगितले आहे. बागला ग्रुपने मनपा आणि जिल्हा प्रशासनला १२० आॅक्सिजन कॉन्सिलेटर्स दिले आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.