coronavirus : औरंगाबादमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 07:59 PM2020-07-02T19:59:36+5:302020-07-02T20:10:54+5:30
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद: आजपासून १५ जुलैपर्यंत सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे . वारंवार आवाहन करूनही नागरीक रात्री उशीरापर्यंत चौका चौकात रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्यामुळे संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे . रुग्णवाढीचा दर चढता असल्यामुळे प्रशासनाने आता अधिक कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे .
कालपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीत ५ जूनपासून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत वावरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पोलिसांनी सायंकाळी ७ वाजेपासूनच संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.
आजपासून १५ जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल . या कालावधीत वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडण्यास सूट देण्यात आली आहे. शिवाय औषधी दुकाने , दवाखाने सुरू राहतील , डॉक्टर , रुग्णालय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेच्या लोकांचा घराबाहेर पडता येईल . रात्री कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना सुट असेल.