coronavirus : औरंगाबादेत सतरा तासांत पाच बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:08 PM2020-06-09T18:08:47+5:302020-06-09T18:09:55+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे.
औरंगाबाद : शहरात सतरा तासांत एका महिलेसह चार वृद्धांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. अशी माहिती मंगळवारी ( दि. ९ ) प्रशासनाने दिली.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
५५ वर्षीय आरीफ कॉलनीतील व्यक्तीला २३ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तीव्र श्वसनविकार, न्युमोनियासह कोरोनामुळे त्यांचा सोमवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला.
४० वर्षीय जाधववाडी येथील बाधित महिलेला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. क्षयरोग, न्युनोनिया, तीव्रश्वसन विकारासह न्युमोनियामुळे मध्यरात्री दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला.
६५ वर्षीय जहागिरदार कॉलनी येथील बाधित वृद्ध व्यक्तीला ६ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना मधुमेहासह तीव्र श्वसनविकार होता. कोरोनामुळे न्युमोनिया झाल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला.
७० वर्षीय युनुस कॉलनीतील वृद्धाला ४ जुनला घाटीत भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाब, तीव्र श्वसनविकार आणि कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियाने त्यांचा मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता मृत्यू झाला.
८३ वर्षीय रमानगर,क्रांतीचौक येथील वृद्धाला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांचा न्युमोनियासह तीव्र श्वसनविकाराने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूपश्चात मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आला.
असे एकूण पाच मृत्यू गेल्या सतरा तासांत घाटी रुग्णालयात झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या ११३ झाली आहे, असे घाटी प्रशासनाकडून कळवण्यात आले.