coronavirus : गरोदर महिलांना घाटी रुग्णालय ठरतेय वरदान; ४४ दिवसांत २३६६ प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:43 PM2020-05-26T18:43:25+5:302020-05-26T18:43:51+5:30
गरोदरपणाच्या कालावधीत खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही समोर आली आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : कोरोनाने थैमान घातल्यामुळे खाजगी आरोग्य सेवाही कोलमडली आहे. अनेक ठिकाणी उपचार करण्यास नकार देण्यात येत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) प्रसूती विभाग गरोदर महिलांना वरदान ठरतो आहे. शहरात १ एप्रिल ते २४ मे या ४४ दिवसांच्या कालावधीमध्ये घाटीत तब्बल २३६६ महिलांची प्रसूती झाली आहे. यात गरोदरपणाच्या कालावधीत खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही समोर आली आहे.
कोरोनामुळे औरंगाबाद शहर रेड झोनमध्ये आहे. या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी राज्यातील खाजगी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार आवाहन करीत आहेत, तरीही अनेक ठिकाणी खाजगी दवाखान्यात कोरोनाशिवाय इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे या रग्णांना नाईलाजाने का होईना आता शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयात कोरोनाबांधितांवर उपचार करण्यात येत असतानाच इतरही रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. खाजगी दवाखान्यात गरोदर महिलांच्या प्रसूतीसंदर्भात अनेकांना विविध अनुभव येतात. यात खर्चही मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रसूती होऊ न देता सिझेरियन केले जाते. मात्र, घाटीतील प्रसूती विभाग नैसर्गिक प्रसूतीवर अधिक भर देतो. आवश्यकता असेल तरच सिझेरियन केले जाते.
शहरात १ एप्रिलपासून कोरोनाचे संकट अधिक गडद होत गेले आहे. सध्या शहरात १३०० पेक्षा अधिक कोरोनाबधित आहेत. त्याचवेळी घाटीतील प्रसूती विभागातही १ ते ३० एप्रिलपर्यंत तब्बल १५६२ गरोदर महिलांची प्रसूती झाली आहे. यात नैसर्गिक प्रसूतींची संख्या १२१५, तर सिझेरियनची संख्या ३४७ एवढी आहे, तर १ ते २४ मे दरम्यान ८०४ प्रसूती झाल्या आहेत. यात ५६१ नैसर्गिक आणि सिझेरियनची संख्या २४३ एवढी आहे. कोरोनाच्या एकूण ४४ दिवसांमध्ये तब्बल २३६६ प्रसूती झाल्याची माहिती घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली.
कोरोनाबाधित गरोदर माता अन् बाळ सुखरूप
घाटीतील प्रसूती विभागात पहिली कोरोनाबाधित गरोदर महिला ३ मे रोजी दाखल झाली होती. या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत एकूण १९ कोरोनाबाधित गरोदर महिला घाटीत दाखल झाल्या होत्या. यातील ४ गरोदर महिलांची प्रसूती झालेली नाही. त्यांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६ महिलांना डिलिव्हरीनंतर कोरोनामुक्त झाल्यावर सुटी देण्यात आली. ९ महिलांवर उपचार सुरू आहेत.
हे डॉक्टर घेताहेत कठोर परिश्रम
कोरोनाच्या संकटात गरोदर महिलांवर उपचार आणि प्रसूती करण्यासाठी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यात युनिट एकमध्ये डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. अंकिता शाह, निवासी डॉक्टर शंतनू पाटील, डॉ. नेहा लोहिया, डॉ. सुश्मिता पवार, डॉ. श्रुतिका माकडे, युनिट दोन मध्ये डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. राहुल इंगळे, डॉ. मेघा गोसाई, डॉ. स्वाती बडगिरे, डॉ. मोहिनी पाटील, डॉ. निशा झा, डॉ. संजय पगारे, युनिट तीनमध्ये डॉ. विजय कल्याणकर, डॉ. मेघा चव्हाण, डॉ. रेवती घायाळ, डॉ. शिवांगी वर्मा आणि युनिट चारमध्ये डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. कनिगा फातिमा, डॉ. सुनील पंडागळे, डॉ. पूजा मोर्या यांचा समावेश आहे.